महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाले. स्थापना दिन आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात आयोजित दसरा मेळाव्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. पहलगाम हल्ला, अमेरिकेने लादलेले टॅरिफ, हिंदुस्थानच्या शेजारील राष्ट्रांमध्ये उफाळून आलेला असंतोष अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो, असे विधान त्यांनी यावेळी केले.
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. भूस्खलन, सतत कोसळणारा पाऊस हे सामान्य झाले असून हिमनद्याही सुकत चालल्या आहेत. हिमालय आपल्यासाठी संरक्षक भिंतीप्रमाणे असून दक्षिण आशियासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. जर सध्याच्या विकास पद्धतींमुळे अशा आपत्तींना प्रोत्साहन मिळत असेल तर आपल्याला आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागेल. हिमालयाची आजची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
मोहन भागवत यांनी नैसर्गिक आपत्तीसोबत शेजारील देशांमधील उलथापालथीवरही भाष्य केले. श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळसह आपल्या शेजारील देशांमध्ये आपण हे अनुभवले आहे. कधीकधी असे घडते, पण जर जनतेची दुर्दशा विचारात न घेता धोरणे आखली नाही तर असंतोष कायम राहतो. शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो. पण तो असंतोष अशा प्रकारे व्यक्त केल्याने कुणाचा फायता होत नाही. अशा प्रकारच्या आंदोलनात हिंसाचार आणि विनाश होतो, याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘grammar of anarchy’, असे म्हटले आहे, असेही भागवत म्हणाले.
#WATCH | During the centenary celebrations of the Rashtriya Swayamsewak Sangh, Sarsanghachalak Mohan Bhagwat says, "… When the government stays away from the people and is largely unaware of their problems and policies are not made in their interests, people turn against the… pic.twitter.com/lJU9sagsaQ
— ANI (@ANI) October 2, 2025
ते पुढे म्हणाले की, लोकशाही मार्गाने परिवर्तन होऊ शकते, अशा हिंसक मार्गाने परिवर्तन होत नाही. क्षणिक उलथापालथ होते, मात्र स्थिती आहे तशीच राहते. जगाचा इतिहास पाहिला तर कोणत्याच क्रांतीला त्याचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. फ्रान्समध्ये राजाच्या विरोधात क्रांती झाली आणि त्याचा परिणाम काय झाला, तर नेपोलियन राजा बनला. राजेशाही कायम राहिली.
कम्युनिस्ट देशांमध्ये क्रांती झाली, पण सगळे देश भांडवलशाही तंत्रावर चालत आहेत. याच्याच विरोधात तिथे क्रांती झालेली. याचाच अर्थ हिंसक परिवर्तनाने उद्दिष्ट साध्य होत नाही. उलट अराजकतेच्या स्थितीत देशाबाहेरील स्वार्थी ताकदीला आपले खेळ खेळायची संधी मिळते. आपल्या शेजारच्या देशांमध्ये उलथापालथ झाली. ते आपल्यापासून लांब नाहीत. काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानचाच भाग होते, ते आपलेच आहेत. त्यामुळे तिथे अस्थिरता होणे आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे, असेही भागवत म्हणाले.
दरम्यान, भागवत यांनी अमेरिकेने लादलेल्या टॅरिफवरही भाष्य केले. अमेरिकेने त्यांच्या फायद्यासाठी टॅरिफ लागू केला, मात्र त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला. जग एकमेकांवर अवलंबून असून सर्व प्रकारचे संबंध आवश्यक आहेत. पण एखाद्या देशावर निर्भर असणे आपली मजबुरी बनू नये. कारण कोण, कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी जीवन जगावे लागेल. स्वदेशीचा वापर करावा लागेल, असेही भागवत म्हणाले. तसेच पहलगाम घटनेनं आपल्याला शिकवले की कोण आपला मित्र आणि कोण शत्रू आहे, असेही ते म्हणाले.