महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | भारत आणि चीन यांच्यात २०२० पासून बंद असलेली विमान वाहतूक सेवा पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीयविमान प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या चीनच्या ३ एअरलाईन्सच्या अर्जांना लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत चिनी एअरलाईन्सला डीजीसीएची मान्यता मिळेल. त्यानंतर काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यावर्षीच्या हिवाळ्यापासून भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये थेट विमान वाहतूक सेवा सुरू होऊ शकते.
भारत आणि चीन यांच्यात भारतातून दिल्ली, मुंबई पासून बीजिंग, शांघाय, ग्वांगझू आणि चेंग्दू येथे थेट विमान सेवा सुरू होईल. कोविड महामारी आणि गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर वाढलेल्या तणावामुळे भारत आणि चीन यांच्यात विमान वाहतूक सेवा बंद झाली होती. मागील ५ वर्षापासून या दोन्ही देशात थेट विमान उड्डाण नव्हते. चीनला जाणारे लोक सिंगापूर, हाँगकाँग आणि बँकॉकसह अन्य दक्षिण पूर्व आशियाई देशाच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात प्रवेश करत होते. त्यातून ना अधिकचा वेळ जायचा सोबतच जास्तीचे पैसेही खर्च करायला लागायचे.
एअर इंडिया, इंडिगो घेणार उड्डाण
आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. तर चीनच्या एअर चायना, चायना ईस्टर्न, चायना सदर्न आणि शेनडोंग एअरलाईन्सने डीजीसीए आणि दिल्ली एअरपोर्टवर स्लॉट देण्यासाठी अर्ज केला आहे. डीजीसीए आणि बीसीएएस मंजूरी मिळाल्यानंतर या चिनी एअरलाईन्स भारतात लँडिंग करू शकतात. डीजीसीए या अर्जांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेत अंतिम टप्प्यात आहेत.
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनमध्ये पोहचले
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ वर्षांनी चीन दौऱ्यावर पोहचले होते. त्यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांतील सहकार्यामुळे २.८ अब्ज लोकांना लाभ होऊन समस्त मानवतेच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल असं मोदी म्हणाले होते. २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या चीन-भारत संघर्षानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा होता. दोन्ही देशांतील ताणले गेलेले संबंध सुरळीत करणे हा या दौऱ्याचा उद्देश होता.