पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ६ ऑक्टोबर | डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढत होते तेव्हा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन त्यांना अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेले पाहू इच्छितात, अशी चर्चा होती. ट्रम्प यांचा विजय झाला तेव्हा त्यामागे रशियन गुप्तचर संस्थांचा हात आहे असा आरोपही झाला. त्यात सत्याचा अंश किती हे सांगता येणे कठीण. एकेकाळी रशियाची शकले करण्यामागे अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचा हात होता असेही म्हटले गेले आहे. या अशा आरोपांचे पुरावे कधी मिळत नसतात. परंतु, युक्रेन प्रकरणात पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प फसले असल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.

निवडणूक जिंकल्याबरोबर ‘आठवडाभरात मी युक्रेनचे युद्ध थांबवून दाखवतो’ असे ट्रम्प म्हणत होते. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना व्हाइट हाउसमध्ये झालेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी अवमानित केले होते. ‘आमच्या मदतीशिवाय युक्रेन रशियासमोर तासभरसुद्धा टिकू शकणार नाही’ असेही ट्रम्प म्हणाले होते. पराभव झालेला प्रदेश युक्रेनने विसरावा आणि त्या भागात अमेरिकेला दुर्मीळ खनिजे काढू द्यावीत अशी ट्रम्प यांची इच्छा होती. त्यांनी रशियाला भागीदारीचे आमिषही दाखवले होते. झेलेन्स्की मजबूर आहेत, ते आपले ऐकतील असा ट्रम्प यांना भरवसा होता. एक वेळ अशीही आली की रशियाही मान्य करील असे वाटून गेले. परंतु, पुतीन चूपचाप शड्डू ठोकून होते. १५ ऑगस्टला अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची भेट झाली. तेथेही पुतीन भारी पडले. आपले सैनिक वाकून वाकून पुतीन यांचे स्वागत का करत आहेत, असा प्रश्न अमेरिकनांना पडला होता. दोघांची भेट झाली उत्साहात; परंतु थंडपणे दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत, रात्रीचे भोजनही सोबत घेतले नाही. आपण आणलेल्या समझौत्याच्या मसुद्यावर पुतीन सही करतील तर नोबेलवरचा आपला दावा पक्का होईल, असा ट्रम्प यांचा होरा होता. पण, पुतीन पडले स्वभावत: ‘गुप्तचर’. त्यांनी नेमकी व्यूहरचना केली.

अलास्कातील बैठकीनंतर पुतीन यांच्या एका मोठ्या योजनेबद्दल मी लिहिले होते. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्या टी-शर्टवर सोव्हिएत संघाचे संक्षिप्त रशियन नाव ‘सीसीसीपी’ लिहिलेले होते. सोव्हिएत संघातून निर्माण झालेल्या सर्व देशांवर आम्ही कब्जा करू इच्छितो असा पुतीन यांचा ट्रम्प यांना स्पष्ट संदेश होता. त्यामुळे पुतीन कुठल्याही समझौत्याला तयार नाहीत, हे स्पष्ट आहे. ट्रम्प यांना असे वाटत होते की, पुतीन त्यांचे मित्र आहेत. परंतु, राजकारणात कोणी मित्र नसतो ना कुणी शत्रू, हे ते विसरले. ट्रम्प स्वतःला नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणवतात. मग शत्रूसारखा व्यवहार का करतात? भारताला मृत अर्थव्यवस्था म्हणताना त्यांची जीभ अडखळली कशी नाही?

रशियाबरोबर ट्रम्प यांची डाळ शिजेना, तेव्हा ट्रम्प यांनी रशियाला कागदी वाघ म्हटले. रशिया कागदी वाघ असता तर नाटोच्या बाजूने युक्रेनला सर्व प्रकारची मदत मिळत असताना युक्रेनच्या १/४ प्रदेशावर त्यांनी ताबा कसा मिळवला असता? १२ फेब्रुवारीला ब्रुसेल्समध्ये आयोजित संरक्षणविषयक शिखर बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीठ हिंगसेथ म्हणाले होते, ‘आम्ही सर्वजण सार्वभौम आणि संपन्न युक्रेन पाहू इच्छितो’. परंतु, २०१४ च्या आधी युक्रेनची हद्द होती ती पुन्हा मिळवणे वास्तवापासून खूपच दूर आहे. या लक्ष्याच्या मागे युक्रेन धावत सुटला तर युद्ध दीर्घकाळ चालेल, खूप नुकसानही होईल. ट्रम्प यांनी आपल्या संरक्षण मंत्र्यांचे भाषण ऐकलेच असेल. पण, ट्रम्प यांना कोलांट उडी मारायला किती वेळ लागतो? ‘रशिया कागदी वाघ असेल तर नाटो काय आहे?’- असा प्रश्न पुतीन यांनी ट्रम्प यांना विचारला. नाटो आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अमेरिका युक्रेनला बरीच मदत करत आहे, तरी युक्रेनची सरशी का होत नाही?- हा त्यांच्या म्हणण्याचा स्पष्ट अर्थ होता. युरोपने हे प्रकरण वाढवले तर रशिया कडक निर्णय घ्यायला थोडासुद्धा बिचकणार नाही हे पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अमेरिका रशियाकडून समृद्ध युरेनियम खरेदी करते हेही पुतीन यांनी स्वत:च सांगितले आहे. भारत आणि इतर देशांना हीच अमेरिका सांगत असते की रशियाकडून ऊर्जा उत्पादने खरीदने बंद करा. हे कसे काय?

पुतीन यांच्या कब्जातील युक्रेनी भूप्रदेशातून दुर्मीळ खनिजे बाहेर काढून पैशाचा पाऊस पाडण्याचे ट्रम्प यांचे स्वप्न पुतीन यांनी चक्काचूर केलेच, शिवाय नोबेल पुरस्कार मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नांवरही आघात केला. ट्रम्प सगळे काही सहन करू शकतील, परंतु नोबेल पुरस्काराचे त्यांचे स्वप्न म्हणजे जणू त्यांचा प्राण आहे. मी तर म्हणतो, ट्रम्प इतके नादावले आहेत तर नोबेल नावाची एखादी ट्रॉफी त्यांना देऊनच टाका. जगात थोडी शांतता तरी निर्माण होईल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *