महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी:खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ६ ऑक्टोबर | केंद्रीय औषध नियामक ‘सीडीएससीओ’ने विषारी कफ सिरपप्रकरणी सहा राज्यांत कसून तपासणी सुरू केली असून त्यात महाराष्ट्रातील औषधी कंपन्यांचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांतही सीडीएससीओची पथके औषध कंपन्यांची तपासणी करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश व राजस्थानात चिमुकल्यांचे जीव घेणाऱ्या ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकोल (डीईजी) नामक रासायनिक पदार्थाचे तब्बल ४८.६ टक्के प्रमाण आढळले आहे.

दरम्यान, छिंदवाडात मृत्यू झालेल्या लहान मुलांना दिल्या गेलेल्या इतर औषधांचे नमुनेही तपासण्यात आले असून त्यात अँटिबायोटिक्ससह इतर औषधांचा समावेश आहे. मात्र, यात कोणतेही घातक घटक आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोल्ड्रिफ हा कफ सिरपच दोषपूर्ण असल्याचे दिसत आहे.
‘कोल्ड्रिफ’ सिरपमध्ये जो डीईजी घटक आढळला तो मूत्रपिंड निकामी करून जीवघेणा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचेच प्रमाण अधिक होते.

केंद्र सरकारकडून दखल
या भयंकर घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली.
सर्व औषध कंपन्यांनी ‘शेड्यूल एम’मधील नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, अशी सूचना आरोग्य सचिवांनी केली.
मुलांसाठी कफ सिरपचा वापर करताना अत्यंत काळजी घेण्याची सूचना सचिवांनी केली.

कायद्यात ही आहे तरतूद
लहान मुलांसाठी विषारी ठरलेला कफ सिरप लिहून दिल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉक्टरवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे सिद्ध झाले तर कायद्यामध्ये या प्रकरणी अनुक्रमे १ वर्ष, १० वर्षे आणि १० वर्ष ते आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *