महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आता गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. नोकरी, उद्योगधंद्यानिमित्ताने गाव सोडून पुणे, मुंबईत आलेले आता गावी निघाले आहेत.
दिवाळीच्या सणासाठी गावी जाण्यास रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या बसला प्राधान्य दिलं जात असून प्रवाशांनी बुकींग सुरू केलं आहे. तर, रेल्वे आणि महामंडळाकडूनही जादा फेस्टीव्हल गाड्या सोडल्या जात आहेत.
रेल्वेने यापूर्वीच जादा गाड्या सोडल्या असून आता एसटी महामंडळानेही जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुणे विभागातून तब्बल 598 जादा गाड्या सोडल्या जात आहेत.
परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल 598 जादा बस सोडल्या जात आहेत. 15 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत या जादा बस सोडण्यात येणार आहेत. पुणे विभागाकडून 15 ऑक्टोबरपासून जादा बस सोडण्यात येणार आहेत.
यंदा पहिल्यांदाच विशेष बस पिंपरी-चिंचवड आगारातून बस सोडण्यात येणार आहेत, तर शिवाजीनगर आणि स्वारगेट येथून प्रवाशांच्या सोयीसाठी काही बस सोडल्या जाणार आहेत.
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे दिवाळीसाठी प्रवाशांची गावी जाण्याची व्यवस्था होणार आहे, पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राहणारे दिवाळीसाठी हे नागरिक गावी जातात.
सध्या रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे, त्यामुळे नागरिकांना एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. तर, ऐन सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदार आपले दर दुप्पट आणि तिप्पटही करतात. त्यामुळे, प्रवाशांची लुबाडणूक होते.
शिवाजीनगर बस स्थानकातून 80, स्वारगेट येथून 122, तर पिंपरी-चिंचववड येथून सर्वाधिक 396 बस सोडल्या जाणार आहेत, अशा एकूण 598 जादा बस सोडल्या जाणार आहेत.
जादा बसचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले असून नागरिक महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाइल अॅपवरून तिकीट बुकींग निश्चित करू शकतात.