महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (६ ऑक्टोबर) वकील राकेश किशोर यांनी बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात यामुळे गोंधळ उडाल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वेळ न दवडता प्रकरणावर युक्तीवाद सुरू ठेवावा, असे निर्देश इतर वकिलांना दिले होते. तीन दिवस या प्रकरणाची देशभरात चर्चा होत असताना सरन्यायाधीश भूषण गवई मात्र शांत होते. आता त्यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लाईव्ह लॉने दिलेल्या बातमीनुसार भूषण गवई म्हणाले की, त्यादिवशी सर्वोच्च न्यायालयात जे घडले, त्यामुळे मला धक्का बसला आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी कोर्ट क्रमांक १ मध्ये प्रवेश केला आणि सरन्यायाधीश बसलेल्या पीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत वकिलाचा प्रयत्न हाणून पाडला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सदर वकिलाला सुरक्षा रक्षक घेऊन जात असताना त्यांनी ‘सनातन का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’, अशी घोषणाबाजी केली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिक्रियेची माहिती पीटीआयने त्यांच्या एक्स हँडलवर दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी इतर न्यायमूर्तींशी चर्चा करत असताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, माझ्या भावाला आणि मला सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला. माझ्यासाठी हे प्रकरण आता विस्मृतीत गेले आहे.
My learned brother and I were very shocked with what happened on Monday; for us it is a forgotten chapter: CJI BR Gavai on shoe attack
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2025
लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सरन्यायाधीश गवई यांचे हे विधान समोर आले. वकील शंकरनारायणन यांनी दशकभरापूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले, शेजारच्या न्यायालयात असाच एक प्रसंग घडला होता. त्यावर मी लेखही लिहिला होता.
My learned brother and I were very shocked with what happened on Monday; for us it is a forgotten chapter: CJI BR Gavai on shoe attack
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2025
ज्या प्रकरणातील युक्तीवादामुळे वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्या खंडपीठात न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान हेही होते. त्यांनी या हल्ल्याबाबत बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, माझे या प्रकरणावर स्वतःचे मत आहे. गवई भारताचे सरन्यायाधीश आहे. हा विनोदाचा विषय नाही. त्यानंतर सदर वकिलांनी माफी मागण्यास नकार दिला. हा या संस्थेचा अपमान आहे.