महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ ऑक्टोबर | गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार होत आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याचे आणि चांदीचे दर वाढल्याचे चित्र दिसते. मागील पाच वर्षांच्या तुलनेत चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर पावणे दोन लाखांच्या आसपास गेली आहे. मागील पाच वर्षांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत चांदीला आणखी चकाकी मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव, येथील सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या भावाचा उच्चांक वाढतच आहे. गेल्या सहा दिवसांत चांदीच्या भावात प्रतिकिलो २१ हजारांची वाढ होऊन चांदीने एक लाख ७० हजारांचा (विनाजीएसटी) टप्पा गाठला तर सोन्यात चार हजार २०० रुपयांची वाढ होऊन सोने प्रतिदहा ग्रॅमला एक लाख २२ हजार २०० रुपयांवर (विनाजीएसटी) पोहोचले आहे. अमेरिकेने आयात शुल्कात वाढ जाहीर केल्यावर सोने-चांदीच्या भावात सातत्याने मोठी वाढ होत आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली.
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, सोने-चांदीच्या भावांत सातत्याने वाढ होते. सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावाने जोरदार उसळी घेतली असून, ‘एमसीएक्स’वर सोन्याचा भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. गेल्या शनिवारी (ता. ४) सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला एक लाख १८ हजार रुपये (विना जीएसटी) होता. शुक्रवारी (ता. १०) त्यात चार हजार २०० रुपयांची वाढ होऊन सोने प्रतिदहा ग्रॅमला एक लाख २२ हजार २०० रुपये (विना जीएसटी) आहे. चांदीचा भाव ४ ऑक्टोबरला प्रतिकिलो एक लाख ४९ हजार (विना जीएसटी) होता. त्यात २१ हजारांची वाढ होऊन चांदी प्रतिकिलो एक लाख ७० हजार रुपये (विना जीएसटी) पोहोचली आहे.
काहीच दिवसात सोन चांदी विना जीएसटी दर
४ ऑक्टोबर सोन १ लाख १८ हजार चांदी एक लाख ४९ हजार
६ ऑक्टोबर सोन १ लाख १९ हजार ५०० चांदी १ लाख ५१ हजार
७ ऑक्टोबर सोन १ लाख २० हजार ५०० चांदी १ लाख ५१ हजार ५००
८ ऑक्टोबर सोन १ लाख २३ हजार चांदी १ लाख ५५ हजार
१० ऑक्टोबर सोन १ लाख २२ हजार २०० चांदी १ लाख ७० हजार