महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर | भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेटसने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० च्या फरकाने निर्भेळ मालिका विजय नोंदवला आहे. याचबरोबर कसोटी कर्णधार म्हणून शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. केएल राहुलने चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सलामीवीर केएल राहुल ५८ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देत माघारी परतला.
भारतीय संघाने २००२ पासून वेस्ट इंडिजविरूद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. २००२ पासून २०२५ पर्यंत भारताने लागोपाठ १० कसोटी मालिका आपल्या नावे केल्या आहेत. जो एक मोठा विक्रम आहे आणि हा रेकॉर्ड कायम ठेवत भारताने ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आज १४ ऑक्टोबर २०२५ला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच दिवशी, भारताने दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. हा विजय गंभीरसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे.