महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ ऑक्टोबर | अक्कलकोट: श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे २० तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.
महेश इंगळे म्हणाले, दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याचा काळ. हा काळ सत्कर्मी लागावा व भविष्यातील जीवन सदाचाराने जगता यावे, यासाठी या दिवाळी सुट्ट्यांच्या काळात पुणे, मुंबई, कोल्हापूर यांसारख्या महानगरांसह देशभरातून अपार श्रद्धेने स्वामीभक्त मोठ्या संख्येने स्वामी दर्शनाकरिता येथे येत असतात.
येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन सुलभरीत्या घेता यावे, यासाठी दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे १६ ऑक्टोबरपासून येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे ३ ते रात्री ११ असे नियमितपणे २० तास खुले राहणार आहे. दिवाळी सुट्ट्यांमधील गर्दीच्या कालावधीत प्रसंगानुसार श्री स्वामी समर्थांचे सामूहिक बॅचमधून अभिषेक होतील.
स्वामीभक्तांची गर्दी वाढत राहिल्यास भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी गर्दीच्या कालावधीत भाविकांच्या वतीने स्वामींना होणारे अभिषेक प्रासंगिक बंद ठेवण्याचा निर्णय पुरोहित व मंदिर समितीने राखून ठेवला आहे. भाविकांच्या सोयीसुविधांना अनुकूल अशा मंदिर समितीच्या नियोजनानुसार येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घेऊन मंदिर समितीस सहकार्य करावे, असे आवाहनही मंदिर समितीचे अध्यक्ष इंगळे यांनी केले.