महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ ऑक्टोबर | देशभरात आज धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा होत असताना, सोनं खरेदी करणार्यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडी निराशा दिसत आहे. कारण, सणाच्या आदल्या दिवशीच सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3,200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,34,800 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.
अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, या दरम्यान चांदीचा भाव 7,000 रुपयांनी घसरला आहे. मागील सत्रात 99.9 टक्के शुद्धतेचं सोनं प्रति 10 ग्रॅम 1,31,600 रुपयांवर बंद झालं होतं. म्हणजेच धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने नवा विक्रम केला आहे.
99.5 टक्के शुद्धतेचं सोनंही तब्बल 3,200 रुपयांनी वाढून 1,34,200 रुपये प्रति 10 ग्रॅम (करासहित) इतकं झालं आहे. गुरुवारी हेच सोनं 1,31,000 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने मिळत होतं.
सोन्याच्या भावात वाढ का झाली?
व्यापाऱ्यांच्या मते, सणासुदीच्या काळात विक्रीत वाढ होईल, या अपेक्षेने अनेक ज्वेलर्सनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. धनत्रयोदशी (शनिवार) आणि त्यानंतर दिवाळी (सोमवार) या सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे.
याशिवाय गुंतवणूकदार आणि विविध देशांच्या केंद्रीय बँका देखील सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत, त्यामुळेही भाव वाढताना दिसत आहेत.
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष जतिन त्रिवेदी यांच्या मते, अमेरिकेत सरकारी वित्तपुरवठ्यातील अडचणींमुळे अनेक विभागांचं काम ठप्प झालं आहे. त्याच वेळी डॉलर इंडेक्स 99च्या खाली गेल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी आणि भाव दोन्ही वाढत आहेत.
चांदी झाली स्वस्त
सोन्याच्या उलट, चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ती तब्बल 7,000 रुपयांनी कमी होऊन प्रति किलो 1,77,000 रुपये इतकी झाली आहे. गुरुवारी हा भाव 1,84,000 रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात, मागील सत्रात सोन्याचा भाव 4,379.29 डॉलर प्रति औंस या उच्चांकावर पोहोचला होता, पण शुक्रवारी तो 0.52% घटून 4,303.73 डॉलर प्रति औंस राहिला. चांदीही 1.32% घसरून 53.43 डॉलर प्रति औंस या स्तरावर आली आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं, पण यंदा सोन्या-चांदीच्या भावांनी सर्व विक्रेत्यांना आणि ग्राहकांना चकित केलं आहे. एका बाजूला सोनं विक्रमी उंचीवर पोहोचलं असताना, दुसरीकडे चांदी काहीशी परवडणारी ठरतेय. त्यामुळे या धनत्रयोदशीला ग्राहकांसमोर “सोनं की चांदी?” असा प्रश्न उभा राहिला आहे.