महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ ऑक्टोबर | दिवाळी सुट्ट्या आणि विकेंडचा संगम — आणि त्यातच प्रवासाला निघालेल्या लाखो नागरिकांमुळे पुणे आणि परिसरातील प्रमुख महामार्ग अक्षरशः ठप्प झाले आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, तसेच पुणे-नगर, पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या खंडाळा घाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. लोणावळ्याजवळ काही काळ वाहनचालकांना थांबावं लागलं, तर टोल नाक्यांवरही प्रचंड गर्दी. कार, खासगी बसेस, आणि दुचाक्यांचा तांडा असल्याने प्रवाशांना तासन्तास अडकून राहावं लागत आहे.
पुणे–नाशिक महामार्गही परिस्थिती काही वेगळी नाही. बोटा गाव आणि घारगाव परिसरात वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा आळेफाट्यापासून पुढे लागल्या आहेत.
पुणे–नगर मार्गावरही रांजणगाव आणि शिक्रापूरजवळ मोठ्या प्रमाणावर कोंडी दिसते. वाहतुकीचं नियोजन नसल्याचा प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर “ट्रॅफिकमध्ये अडकलोय” अशा पोस्ट्सचा पूर आलाय.
दरम्यान, सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात शनिवारी सकाळपासूनच मोठी कोंडी झाली आहे. दत्त मंदिराजवळ किरकोळ अपघात झाल्यानंतर वाहतूक काही काळ ठप्प राहिली, आणि नंतर वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी गंभीर बनली. हजारो वाहनचालक सध्या महामार्गावर अडकले आहेत.
दिवाळीचा आनंद घराघरात पोहोचण्याआधीच, महामार्गांवर ‘कोंडीची दिवाळी’ सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल!