महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ ऑक्टोबर | रशियन तेल खरेदी थांबवण्याच्या धमक्या देत भारताला दबावात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत जुमानत नसल्याचे पुन्हा सिद्ध झालं आहे. भारताची ऑक्टोबरमधील रशियन तेल आयात पुन्हा वाढली असून, इतर देशांच्या तुलनेत रशियातून होणारी तेल खरेदी आजही सर्वाधिक असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. भारतीय रिफायनऱ्यांनीही सांगितलं की सरकारनं अद्याप रशियन तेल आयात थांबवण्याचे निर्देश दिलेले नाहीत.
ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या केप्लर या जागतिक व्यापार विश्लेषण कंपनीच्या आकडेवारीनुसार, आयात पुन्हा वाढून १८ लाख बॅरल प्रतिदिन इतकी झाली असून ही सप्टेंबरच्या तुलनेत २.५ लाख बॅरल प्रतिदिन जास्त आहे.
पर्याय काय असू शकतो?
रशियन तेलाला पर्याय म्हणून मध्यपूर्व, अमेरिका येथून अधिक पुरवठा मिळू शकतो, पण खर्च वाढणे, वाहतुकीचा वेळ व खर्च वाढणे यामुळे हा पर्याय सध्या शक्य नाही.
रशिया भारताचा तेल’मित्र’
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लावले. युरोपने रशियन तेलाकडे पाठ फिरवल्यामुळे रशियन तेल मोठ्या सवलतीत उपलब्ध झाले आणि भारताने या खरेदीत झपाट्याने वाढ केली. परिणामी, २०१९-२० मध्ये एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा जेमतेम १.७% होता, तो २०२३-२४ मध्ये ४०% पर्यंत वाढला. रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार ठरला.
रशियन तेल आयात अचानक थांबवणे भारतासाठी खर्चिक आणि जोखमीचे ठरेल. त्यामुळे सरकारनं थेट आदेश न दिल्यास रिफायनऱ्या रशियन तेलापासून दूर जाणार नाहीत.
सुमित रिटोलिया, केप्लरचे प्रमुख रिसर्च ॲनालिस्ट