![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ ऑक्टोबर २०२५ | दिवाळी सुट्टीचा आनंद घेतलेले चाकरमानी आता पुन्हा कामावर परतण्यासाठी पुणे आणि मुंबईकडे निघाले (Heavy Traffic on Satara–Pune Highway) आहेत. त्यामुळे साताराहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी सकाळपासूनच खासगी वाहने, एसटी बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतूक वाढली असून, महामार्गावर वाहतुकीचा ताण जाणवत आहे.
रस्त्यावरील परिस्थिती पाहता, अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. विशेषतः खंडाळा व पारगाव परिसरात महामार्गाखालील पूल अरुंद असल्याने वाहनांची रांग लागली आहे. पारगाव–खंडाळा आगारातील एसटी बसना महामार्गावरील सर्व्हिस रोडवर उभे करून प्रवासी चढवले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
दरम्यान, अबालवृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती त्रासदायक ठरत असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहतुकीतील वाढ लक्षात घेता, सायंकाळी पुणेकडे जाणाऱ्या मार्गावर अधिक गर्दी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

