Gold Rate Today: सोन्याची ‘गिरकी’! दोन दिवसांत दर घसरले; सराफा बाजारात खरेदीदारांची चांदी

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मार्च २०२६ ।। सोन्याच्या दराने गेल्या काही महिन्यांत जी भरारी घेतली होती, ती पाहून सामान्य माणसाच्या खिशाला अक्षरशः भोवळ आली होती. सोनं म्हणजे लग्नसमारंभापुरतं किंवा श्रीमंतांच्या तिजोरीपुरतंच उरलं की काय, अशी भीती अनेकांना वाटू लागली होती. पण बाजाराचे खेळ निराळेच असतात. कालपर्यंत गगनाला भिडणारे दर अचानक जमिनीवर येतात आणि ‘अहो, अजून घ्या ना!’ अशी हाक देऊ लागतात. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून सराफा बाजारात थोडीशी हालचाल दिसू लागली आहे. कालपर्यंत किंमतीच्या उंच कड्यावर उभे असलेले सोनं आज जरा खाली उतरले आहे आणि त्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल ९८० रुपयांची घसरण झाली असून भाव १,६१,२४० रुपयांवर आला आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ७८४ रुपयांनी कमी होऊन १,२८,९९२ रुपयांवर स्थिरावला आहे. तर १० तोळ्यांच्या खरेदीवर तब्बल ९,८०० रुपयांची घट दिसून येते. २२ कॅरेट सोन्याच्याही भावात मवाळपणा दिसतो आहे. या सोन्याचा प्रति तोळा दर ९०० रुपयांनी घसरून १,४७,८०० रुपये झाला आहे. ८ ग्रॅम सोनं १,१८,२४० रुपयांवर आले असून १० तोळ्यांच्या खरेदीत ९ हजार रुपयांची घट झाली आहे. १८ कॅरेट सोनंही मागे राहिलेलं नाही; त्याचा प्रति तोळा दर ७४० रुपयांनी कमी होऊन १,२०,९३० रुपयांवर आला आहे. थोडक्यात, सोन्याचा बाजार आज जरा ‘थंड’ झाल्याचे चित्र आहे.

मात्र या घसरणीकडे पाहून सोनं स्वस्त झालं असं म्हणण्याइतकं सोपं गणित नाही. कारण कालपर्यंत जे दर १.८० लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले होते, ते अजूनही दीड लाखांच्या घरातच आहेत. सामान्य माणसासाठी हे दर अजूनही डोंगराएवढेच आहेत. तरीही बाजाराची एक गंमत असते – किंमत थोडीशी जरी खाली आली, तरी ग्राहकांच्या आशा मात्र आकाशात झेपावतात. सराफा बाजारातही तशीच चर्चा रंगली आहे. ‘आता अजून थोडं थांबू या, दर अजून कमी होतील,’ असा एक गट म्हणतो; तर दुसरा गट ‘संधी साधा, पुन्हा सोनं उडू लागेल,’ असा इशारा देतो. शेवटी सोनं हे केवळ धातू नाही; ते भारतीयांच्या भावना, परंपरा आणि भविष्यातील सुरक्षिततेचे प्रतीक आहे. त्यामुळे दर वाढोत की कमी होवोत, सोन्याकडे पाहणाऱ्या नजरा मात्र कायम तशाच चमकत राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *