![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ ऑक्टोबर २०२५ | नेरळहून निघणाऱ्या मिनी ट्रेनमधून प्रवास करणं ही माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. अशातच आता नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर नेरळ – माथेरान मिनी ट्रेन धावायला सुरुवात होते. पूर्वी दसऱ्यानंतर 15 ऑक्टोबरला ट्रेनचा मुहूर्त ठरवला होता मात्र सततच्या अनियमित पावसामुळे हा मुहूर्तही हुकला. त्यामुळे तब्बल एक महिना माथेरानच्या राणीला प्रवाशांच्या सेवेत येण्यास उशीर झाला आहे. असं असलं तरी आता 1 नोव्हेंबर रोजी ही माथेरानची राणी नेरळ रेल्वे स्थानकातून धावणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली आहे.

माथेरानमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून, कड्यावरचा गणपती परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या ठिकाणी रेल्वे ट्रॅकखालील भाग कमकुवत झाल्याने सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे कामाचा वेग मंदावला असून, रेल्वे विभागाने या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गती दिली आहे. नेरळ स्थानकाचे स्टेशन मास्तर गुरुनाथ पाटील यांनी अलीकडेच माथेरान मार्गावरील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले असले तरी, मिनी ट्रेन लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही महत्त्वाची कामे मार्गी लागल्यानंतर मालवाहू ट्रेनची ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
1907 पासूनची ‘माथेरानच्या राणी’ ची ऐतिहासिक परंपरा :
हिवाळ्यात अनेक पर्यटक माथेरानला भेट देत असतात. 1907 पासूनची ऐतिहासिक परंपरा माथेरान मिनी ट्रेन ही 1907 साली ब्रिटिश काळात सर आदमजी पिरभाय यांनी सुरू केली. दरवर्षी 15 जून रोजी पावसाळ्यामुळे ट्रेन बंद केली जात असे आणि दसऱ्याच्या सुमारास पुन्हा सुरू केली जायची. या ट्रेनमुळे माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळते. परंतु यंदा अनियमित हवामानामुळे शिरस्ता मोडीत निघाल्याने पर्यटक आणि व्यापारी दोघेही नाराज आहेत. मे महिन्यातच सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपायला आला तरी सुरूच आहे.
अमन लॉज-माथेरान शटल सेवा सेवेत :
अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सध्या सुरू असून पर्यटकांना तिचा आनंद घेता येतो आहे. मुसळधार पावसातही ही सेवा अखंडित सुरू राहिली आहे. त्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळत आहे. 66 मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, आता साधारण 1 नोव्हेंबरला पहिली नेरळपासून माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.