![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ ऑक्टोबर २०२५ | ऑक्टोबर महिन्यामध्ये एकाएकी तापमानवाढ झाली आणि या तापमानवाढीनं नागरिक बेजार झाले. इथं ही परिस्थिती असतानाच दुसरीकडे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावल्यानं हा नेमका कोणता ऋतू सुरू आहे हाच प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करु लागला आहे. प्रत्यक्षात मान्सूननं राज्यातूनच नव्हे तर देशातूनही माघार घेतली असली तरीही बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. ज्या धर्तीवर प्रामुख्यानं विदर्भ आणि नजीकच्या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ज जारी करण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rainfall, gusty winds with speed reaching 40-50 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and North Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 26, 2025
मुंबईपासून कोकणापर्यंत पाऊसमारा…
प्रामुख्यानं पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं परिणामस्वरुप मुंब ईसह कोकणात येत्या पुढील 4 दिवस अर्थात 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या इशाऱ्याच्या धर्तीवर राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असून त्यांचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात पुढचे तीन दिवस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर, रायगड जिल्ह्यात पावसामुळे नागरिकासह शेतकऱ्यांपुढंही अनेक अडचणी उभ्या राहिल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडसह संपूर्ण कोकणात पुढच्या चार दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांनी कापणीची कामंही थांबवल्याचं चित्र आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर, मासेमारांनासुद्धा खोल समुद्रात न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्यांची दिशा पाहता सर्व मासेमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीच्या इशाऱ्यानुसार, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वाय़ऱ्याचा वेग 29 ऑक्टोबरपर्यंत 35 ते 45 किमी ताशी इतका असेल. हा वेग अगदी 55 किमी ताशीपर्यंतही जाऊ शकतो. ज्यामुळं मासेमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या 24 तासांमध्ये किनारपट्टीजवळून पुढे सरकणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं अधिक असेल. तर हा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्कामी असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.
