महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ९ सप्टेंबर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ‘एमसीक्यू’ बेस्ड (बहुपर्यायी) परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. परीक्षा पद्धतीबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नसून, विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देता येण्यासाठी विद्यापीठाकडून तयारी केली जात आहे. दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणार्या, ‘गॅजेट्स’चा आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा सर्व्हे करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून परीक्षेची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने परीक्षेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन असे पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.
काही विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांतील विषयांच्या परीक्षा नियमाप्रमाणे 40 गुणांच्या राहतील. अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा गुगल मीट किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा पर्याय वापरुन घ्यायच्या आहेत. कोरोनामुळे प्रत्यक्ष प्रयोगशाळांमध्ये येऊन प्रात्यक्षिक परीक्षा शक्य नाही, असे डॉ. काकडे म्हणाले.
अंतिम वर्षाच्या परीक्षा किती विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने देऊ शकतात, याची चाचपणी विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून सर्व्हेद्वारे संबंधित माहिती भरून घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीसह त्याच्याकडे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, अँड्रॉईड मोबाईल अशी साधने आहेत का, त्यांची रॅम, स्क्रीन, इंटरनेट स्पीड, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ऑपरेटिंग सिस्टीम अशी माहिती विद्यार्थ्यांना स्टुडन्ट प्रोफाइल सिस्टीममधून भरायला सांगण्यात आली आहे. विद्यार्थ्याने ही माहिती एकदा भरली की, ती अंतिम समजली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहिती काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.