“त्यांना आमच्या मदतीची गरज नाही” – दिल्ली बॉम्बस्फोटावर अमेरिकेची प्रतिक्रिया

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ नोव्हेंबर २०२५ – दिल्लीत भीषण स्फोट झाला, देश हादरला… आणि मग जगभरातून “निंदा”, “चिंता”, “सहानुभूती” यांचा ओघ. पण अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांची प्रतिक्रिया मात्र वेगळीच – “भारताला आमच्या मदतीची काहीच गरज नाही. ते स्वतःच हे उत्तम हाताळत आहेत.”

हो, एवढ्या मोठ्या कटाची चौकशी भारत उत्तम रित्या करत असल्याचं गोड कौतुक!
आता प्रश्न एवढाच —ही खरी प्रशंसा आहे की अतिशय सभ्य भाषेत दिलेला “तुम्ही स्वतःच सांभाळा” प्रकारचा राजनैतिक इशारा?

अमेरिकेची ऑफर आणि ‘गरज नाही’चा टोमणासारखा गौरव कॅनडातील जी-७ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर मार्को रुबियो म्हणाले — “आम्ही मदत करायला तयार होतो, पण भारताची यंत्रणा सक्षम आहे. त्यांना आमची गरज नाही.”

अहो, छान आहे!
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झाला तो काही छोटासा फटाक्यांचा आवाज नव्हता. तरीदेखील ‘भारत सक्षम आहे’ म्हणत अमेरिकेने दिलेलं प्रमाणपत्र —
कौतुक की करवत? हे वाचकांनी ठरवायचं!

अमेरिकन दूतावासाचा निषेध — लिखित संवेदना, प्रत्यक्ष अंतर दिल्लीस्फोटावर अमेरिकन दूतावासाचा निषेध. राजदूत सर्जिओ गोर यांनी “आम्ही दु:खात सहभागी आहोत” असं ट्विट केलं. प्रार्थना केली. हो, जगातल्या मोठमोठ्या संकटांना ट्विटरच्या संवेदनांनीच तर बरं वाटतं!

जयशंकर–रुबियो चर्चा — राजनैतिक शब्दांचे साखरेचे कवच
जी-७ बैठकीत जयशंकर आणि रुबियो आमनेसामने आले. दोन देशांतील जागतिक मुद्दे, दहशतवाद आणि अर्थातच दिल्ली स्फोटावर चर्चा. सगळं काही नीटनेटका राजनैतिक शब्दप्रसादात गुंडाळलेलं — जिथे चिंता असते, तिथे सहकार्य म्हटलं जातं; जिथे राग असतो, तिथे द्विपक्षीय संवाद म्हटलं जातं; आणि जिथे मदत देण्याचा हेतू नसतो, तिथे “त्यांना आमची गरज नाही” असं सुनवलं जातं!

डॉ. उमर नबी — कटाचा सूत्रधार, मृत्यूने उघड झालेली ओळख लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारा व्यक्ती कोण? तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच संशय होता — काश्मीरमधील डॉ. उमर उन नबी.

स्फोटात शरीराचे तुकडे —
ओळख अशक्य. पण डीएनए मात्र बोलला —कारमधील मानवी अवशेष उमरचाच. स्फोटाच्या ११ दिवस आधी त्याने हुंडई आय-20 खरेदी केली होती.
तीच कार त्याचा शेवटचा प्रवास ठरली —तो स्फोट घडवताना त्यातच संपला.

मोठं चित्र — भारताची चौकशी सक्षम, जग निरीक्षक
अमेरिका म्हणते भारत सक्षम.
जागतिक माध्यमं प्रश्न विचारत आहेत.
पाकिस्तान–दुबई कनेक्शन उघड होतंय.
भारताची सुरक्षा यंत्रणा तातडीने हलली आहे.

पण सगळ्याचं सार काय?
जग फक्त निषेध, चिंता, संवेदना देतं. दहशतवादाशी लढाई मात्र आपल्यालाच लढायची असते. अमेरिकेने तेच सांगितलं —उघडपणे नव्हे, पण राजनैतिक ओवीत गुंडाळून.

“ते सक्षम आहेत. त्यांना आमची गरज नाही.” हे वाक्य कौतुक वाटत असले तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *