महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १० सप्टेंबर – दोन दिवसांपूर्वीच भारतानं कोरोनारुग्णांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकलं. कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलाय.त्याआधीच्या आठवड्यात जीडीपीचे आकडे जाहीर झाले. जीडीपीचे आकडे नकारात्मक असतील, याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण ते व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही अधिक घसरले. -23.7 हा गेल्या तिमाहीतला आपला जीडीपीचा दर आहे.
पण या गोष्टींपेक्षाही एका अतिशय महत्त्वाचा प्रश्न इलेक्ट्रॉनिक मीडियामधून मांडला जात होता. सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात रिया चक्रवर्तीचं काय होणार? कोरोना, अर्थव्यवस्थेची घसरण, बेरोजगारी, सीमेवर भारत-चीनदरम्यानचा तणाव यापेक्षाही रिया चक्रवर्ती हा देशासमोरचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याचं चित्र कोणतंही टीव्ही चॅनेल पाहताना निर्माण होत होतं.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ऑफिसबाहेर माध्यमांनी ज्याप्रकारे रियाला गराडा घातला होता, त्या दृश्यावर सेलिब्रिटींसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
I haven’t seen the worst of the criminals being treated like this even after being convicted! Let there be a trial !!! Absolutely disgusted with the way the media is treating her ! #shame https://t.co/fpnxqd7IM7
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) September 6, 2020
त्याघडीला माध्यमांच्या प्रतिनिधींना जणू कोरोना, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्याचा विसर पडला होता. ही कोणत्या प्रकारची स्पर्धा आहे? सर्वांत आधी, एक्सक्लुझिव्हच्या शर्यतीच्या मागे नेमकी काय कारण आहेत? टीआरपीचं गणित, लोकांचा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील रस की गंभीर विषयांपासून लोकांचं लक्ष हटविण्याचा प्रयत्न?