![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | दक्षिण भारतातील ‘डिटवाह’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच महाराष्ट्राच्या हवामानातही बदल जाणवू लागला आहे. आकाश निरभ्र होऊ लागले असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा जोर कमी झालाय. त्यामुळे राज्यातील थंडीची लाट ओसरत असल्याचे हवामान विभागाचे संकेत आहेत. मात्र गारठा मात्र पूर्णपणे कमी झालेला नाही. सकाळ–संध्याकाळची सर्द हवा नागरिकांना अजून त्रास देणार आहे.
‘डिटवाह’ चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागरात सरकले असून उत्तर तमिळनाडू किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला जोडून ७.६ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची रचना कायम असल्याने वातावरणात अस्थिरता राहणार आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात रात्रीच्या तापमानात घट कायम असून गारठा ठसठशीत जाणवत आहे.
राज्यात किमान तापमानात चांगलीच घसरण दिसून आली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी ८.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विशेषतः घाटमाथ्यावर तापमान झपाट्याने खाली येत आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर या भागांतही गारठा आणि दववृष्टीचा प्रभाव कायम राहणार आहे.
दरम्यान दक्षिण भारतात पुढील २४ तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांत हिमवर्षाव वाढल्याने किमान तापमान मोठ्या प्रमाणात खाली येत आहे. या थंड प्रवाहाचा परिणाम पुढील काही दिवसांत महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
