✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | डॉलरसमोर रुपया कोसळला… आणि थेट ९०.२१ वर घसरत इतिहासात प्रथमच ‘नव्वदीपार’ झाला! परदेशी गुंतवणूक बाहेर जाणे, वाढती व्यापारतूट आणि अमेरिका–भारत व्यापार कराराचा पेच – या तिन्हींच्या फटक्यात भारतीय चलनाने आशियातील सर्वांत वाईट कामगिरीची नोंद केली. घसरण फक्त रुपयाची नाही; तर महागाईचा काटा सर्वसामान्यांच्या घरात पोहोचण्याची चाहूल आहे.
दुसरीकडे सरकार मात्र निवांत! “यात घाबरण्यासारखं काही नाही; पुढील वर्षी सुधारणा शक्य,” असा मुख्य आर्थिक सल्लागारांचा दावा. परंतु रुपयाच्या या घसरणीचा अर्थ आयात महाग, पेट्रोल-डिझेलपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व वस्तूंचा वाढता खर्च. विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षण, कुटुंबांचे परदेशी दौरे आणि गृहिणींचा स्वयंपाकखर्च – सगळ्यांवर हा आर्थिक घाव.
रुपया कोसळला की निर्यातदारांच्या चेहऱ्यावर हसू येतं, हे खरं. भारत पर्यटकांसाठी स्वस्त ठरतो, मेडिकल टुरिझमचीही चांदी. पण दुसरीकडे तेल, सोने, चांदी यांसारख्या आयात महत्त्वाच्या वस्तूंचा भाव डlblढक वाढतो. १९९१, जागतिक मंदी, कोरोना, रशिया-युक्रेन – अशा संकटांनंतर आता ही नवी घसरण. ३१ डिसेंबर २०२४ ते आजपर्यंत तब्बल ५.०६% अवमूल्यन.
एकूण चित्र असे: फायदा काहींनाच, पण तोटा सर्वांना! रुपया ९०वर जाणे ‘सामान्य’ असल्याचा सरकारी दावा असला, तरी बाजारपेठा आणि सर्वसामान्यांची धडधड वाढली आहे. कारण चलनाचा ताबा सुटला की, चटका मात्र स्वयंपाकघरापासून उद्योगांपर्यंत सर्वांना बसतो… आणि यावेळी तो अगदी थेट जाणवणार आहे.
