![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | मुंबईच्या पोटात ५२ मीटर खोल – म्हणजे अक्षरशः १६ मजली इमारतीइतक्या खोलीतून – आणि तब्बल ७०० इमारतींच्या खालील मार्ग चिरत जाणाऱ्या ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह बोगद्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू झाले. भाऊचा धक्का ते मरीन ड्राईव्ह हा पाच किलोमीटरचा प्रवास जमिनीवर एकही अडथळा न आणता, मेट्रो-३च्या मार्गाखालून जात पूर्ण करायचे धाडस एमएमआरडीएने दाखवले असून, हा प्रकल्प म्हणजे मुंबईच्या इतिहासातील नवा ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरणार हे निश्चित.
हा बोगदा पूर्व मुक्त मार्गाला कोस्टल रोडशी जोडणारा असल्याने त्याचे महत्त्व अधिक. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास सोपा करणे आणि पूर्व-पश्चिम उपनगरांचे अंतर कमी करणे—या तिन्ही उद्दिष्टांसाठी हा भुयारी मार्ग एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. इंधन बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात घट… या सगळ्यांचे उत्तर एका बोगद्यात दडलेले असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
पूर्व मुक्त मार्गामुळे वाहनांना दक्षिण मुंबईपर्यंत पोहचणे सोपे झाले असले, तरी पुढील प्रवासात येणारी कोंडी अजूनही जाचक होती. नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा वळसा घ्यावा लागत होता. या दोन्ही समस्यांवर या बोगद्याने कायमचा तोडगा निघणार आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षा अधिक गर्दीच्या परिसरात बोगदा हा एकमेव पर्याय असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.
या प्रकल्पाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘गडद’ गुंतागुंत. शतकभर जुन्या हेरिटेज इमारती, ७०० प्रॉपर्टीज, पश्चिम-मध्य रेल्वे आणि मेट्रो-३ची स्टेशनं—या सगळ्यांच्या खाली ५२ मीटर खोल बोगदा खोदण्याचे आव्हान स्वीकारले गेले आहे. अत्याधुनिक ‘स्लरी शिल्ड’ टनेल बोरिंग मशीनने भारतातील सर्वाधिक अवघड भू-तांत्रिक कामांपैकी एक प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. मुंबईच्या भविष्यकालीन वाहतुकीला नवा मार्ग दाखवणारा हा भुयारी महामार्ग आता प्रत्यक्षात येऊ लागला आहे.
