![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे आपण ऐकतो; पण रत्नागिरीच्या वेदा सरफरेने ते अक्षरशः पाण्यात सिद्ध केलं! इतर मुलं रांगायला शिकत असताना वेदाने नऊ महिन्यांतच पोहायला सुरुवात केली. आणि आज—वय अवघं १ वर्ष ९ महिने—तिने 100 मीटरचं अंतर 10 मिनिटे 08 सेकंदांत पार करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव झळकवलं. देशातील सर्वात लहान जलतरणपटू ही मानाची पदवी तिने मिळवली आहे.
वेदाचं जलतरणप्रेम कुठलं अचानक पेटलेलं कौतुक नव्हे, तर घरातूनच मिळालेली प्रेरणा आहे. मोठा भाऊ रुद्र रोज जलतरण तलावात सराव करताना ती आईच्या पंबऱ्यावरून टक लावून पहायची. आणि एका दिवशी प्रशिक्षक महेश मिलके यांनी तिला पाण्यात सोडलं—वेदाने रडणं तर सोडाच, उलट पाण्यावर हातपाय मारत स्वतःची ओळख निर्माण केली. कठड्यावरून पाण्याकडे डोकावताना दिसणारा तिचा आत्मविश्वास, एखाद्या मोठ्या पोहणपटूची आठवण करून देणारा आहे.
आई पायल सरफरे यांचाच हा दृढनिश्चय. गर्भारपणातही त्या रुद्रच्या स्पर्धांना जायच्या, सरावासाठी रोज तलावावर हजेरी लावत. त्यामुळे वेदाने पाणी जन्मापूर्वीच अनुभवलं, असं म्हणायला हरकत नाही. ‘ती लहान असतानाही आम्ही तिला रोज तलावावर आणायचो,’ असं वेदाचे वडील परेश सरफरे सांगताना अभिमान लपवत नव्हते. प्रशिक्षक गौरी मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली वेदा आता अधिक परिपूर्ण सराव करत आहे.
इंडियन बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता या छोट्या ‘जलपरिणी’चं लक्ष्य आणखी मोठं आहे—आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! इतक्या लहान वयात असा कसदार आत्मविश्वास, अशी झपाटलेली मेहनत आणि अशी असामान्य गती… वेदा सरफरेचं पुढचं यश आता केवळ वेळेची वाट पाहतं आहे. रत्नागिरीची ही चिमुकली आज संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरली आहे.
