![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | पुणे आणि नाशिक—महाराष्ट्राची दोन महत्त्वाची शहरे—आता रेल्वेने आणखी जवळ येणार आहेत. केंद्र सरकारने पुणे–नाशिक हाय-स्पीड आणि सेमी–हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पास हिरवा कंदील देताच दोन्ही शहरांमधील प्रवासाचा चेहरामोहराच बदलणार आहे. रस्त्याने लागणारे ५–६ तास आता केवळ अडीच तासांत पार होतील. महामार्गावरील अखंड वाहतूककोंडीपासून सुटका आणि व्यावसायिक, पर्यटक, उद्योग या सर्व क्षेत्रांना मोठ्या फायद्याची हमी या प्रकल्पातून मिळणार आहे.
लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. जीएमआरटी क्षेत्राला धक्का न लावता तयार केलेल्या पर्यायी मार्गरचनेला मंजुरी देत वैज्ञानिक संस्थेचा परिसर संरक्षित ठेवण्यात आला आहे. नाशिक ते पुणे दरम्यान नाशिक–शिर्डी–पुणतांबा–निंबलक–अहिल्यानगर–पुणे असा प्रस्तावित मार्ग असेल. अनेक टप्प्यांतील डबल-लाइन कामे वेगाने सुरू असून काही मार्ग पूर्ण, काही मंजूर आणि काही कामे अंतिम टप्प्यावर आहेत.
या हाय-स्पीड मार्गामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. नाशिकचा वारसा, शिर्डीचे महत्त्व आणि पुण्याचे ऐतिहासिक-शैक्षणिक वैभव एका साखळीत जोडले जाणार आहे. त्र्यंबकेश्वर, शिर्डी, पंढरपूर आदी तीर्थमार्गांना अधिक सुरक्षित आणि जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. ग्रामीण पर्यटन, स्थानिक हस्तकला आणि पारंपरिक उद्योगांना नवसंजीवनी मिळेल.
चाकणसारख्या औद्योगिक पट्ट्यास या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ होणार आहे. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग आदी उद्योगांना जलद वाहतूकसोयींचा मोठा फायदा, तर विद्यार्थ्यांची गतिशीलता, शैक्षणिक देवाणघेवाण आणि कौशल्य विकासाला नवी गती मिळेल. पुणे–नाशिक रेल्वे मार्ग हा महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील निर्णायक टप्पा ठरेल, यात शंका नाही.
