![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरपर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असले, तरी नोव्हेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता अजूनही बहिणींच्या खात्यात पोहोचलेला नाही. महिनाअखेर उलटूनही व्यवहार न झाल्याने लाखो महिलांची उत्सुकता टोकाला पोहोचली आहे. वित्त विभागाकडून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती मात्र प्रशासनाकडून दिली गेली आहे.
योजनेचा नोव्हेंबर हप्ता येणाऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात, अशीही दाट चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत खुशखबर मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे.
यंदा नोव्हेंबर–डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, याबाबतही महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणूकपूर्व काळात सरकारने दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले होते. यंदाही तसाच निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी यासंबंधी अधिकृत मुहर अजून लागलेली नाही. नोव्हेंबरचा हप्ता आधी आणि डिसेंबरचा शेवटचा हप्ता नंतर दिला जाण्याचं सूत्रांनुसार अधिक संभाव्य चित्र आहे.
दरम्यान, योजनेतील सर्व लाभार्थिनींसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आले असून अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित आहे. लाखो महिलांची केवायसी अद्याप अपूर्ण असल्यानेच मुदतवाढ देण्यात आली आहे. केवायसी न झाल्यास पुढील महिन्यापासून योजनेचा फायदा थांबणार असल्याने लाभार्थींनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
