✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ५ डिसेंबर २०२५ | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अखेर कर्जदारांना दिलासादायक निर्णय देत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केली आहे. तीन दिवस चाललेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नवा दर ५.५० वरून ५.२५ टक्के असा घोषित केला. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात कमी दर मानला जात असून या निर्णयातून आरबीआयची ‘अनुकूल आणि वाढीस चालना देणारी’ भूमिका स्पष्ट दिसते.
रेपो रेट म्हणजे बँका आरबीआयकडून कर्ज घेण्याचा दर. तो कमी झाला की बँकांचे कर्ज स्वस्त होते आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे कर्जावरील मासिक हप्ते (EMI) कमी होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर किरकोळ कर्जांवर व्याजदर कमी होऊ शकतात. बँकांना लिक्विडिटी व्यवस्थापनातही सहजता मिळेल, त्यामुळे FD दरात मोठे बदल करण्याचा दबाव राहणार नाही.
२५ बेसिस पॉइंट्सच्या या नवीन कपातीने गृहकर्जदारांना सर्वाधिक दिलासा मिळणार असल्याचे दिसते. अनेक बँकांनी आधीच त्यांच्या बेंचमार्क-लिंक्ड दरांमध्ये कपात सुरू केली आहे. त्यामुळे नवीन कर्जदारांपासून ते फ्लोटिंग रेटवर असलेल्या जुन्या ग्राहकांपर्यंत सर्वांना EMI कमी होण्याचा थेट फायदा मिळणे अपेक्षित आहे. वाढत्या व्याजदरांच्या काळानंतर ही कपात ग्राहकांसाठी मोठा श्वास आहे.
२०२५ वर्षभरातील रेपो रेटच्या एकूण कपातीचा आकडा आता १.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी ते जून दरम्यान १ टक्क्यांची कपात झाल्यानंतर ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये दर स्थिर ठेवण्यात आला होता. मात्र, यावेळी आरबीआयने महागाईचा अंदाजही २.६ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. “उत्पादन आणि सेवा क्षेत्रात स्थिर वाढ दिसतेय. म्हणूनच तटस्थ भूमिकेसह पुढे जातोय,” असे गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले.
