![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ डिसेंबर २०२५| इंडिगो विमान कंपनीचा गोंधळ कमी होण्याचे नाव घेत नाही. मागील काही दिवसांपासून उड्डाणे रद्द होण्याच्या मालिकेत शुक्रवारी आणखी भर पडली असून तब्बल 400 हून अधिक उड्डाणे रद्द केली गेली. अचानक रद्द झालेल्या फ्लाइट्समुळे अनेक विमानतळांवर प्रवाशांचा खोळंबा झाला, काही जण तासन्तास अडकून पडले तर काहींची महत्त्वाची कामे रखडली.
इंडिगोने एका निवेदनातून सांगितले की, गेल्या दोन दिवसांत त्यांच्या नेटवर्कमध्ये व्यापक अडथळे निर्माण झाले असून कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे. यापूर्वीही 500 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करून इंडिगोने प्रवाशांचे हाल वाढवले होते. या सलग व्यत्ययामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली असून विमान कंपनीवर टीकेची झोड उठली आहे.
या परिस्थितीचे प्रमुख कारण म्हणजे एफडीटीएल नियमांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करताना घेतलेले चुकीचे निर्णय आणि नियोजनातील त्रुटी, असे इंडिगोने कबूल केले आहे. पायलट ड्यूटी टाइम नियमांची चुकीची हाताळणी झाल्याने अनेक क्रू अनुपलब्ध झाले आणि उड्डाणे रद्द करण्याशिवाय कंपनीकडे दुसरा पर्याय राहिला नाही.
कंपनीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) दिलेल्या माहितीत सांगितले की ८ डिसेंबरपासून फ्लाइट विलंब होणार नाही आणि १० फेब्रुवारीपर्यंत सर्व कामकाज पूर्ववत करण्याचे लक्ष्य आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांना “कधी उड्डाण मिळेल?” या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनिश्चितच दिसत आहे.
