टोलबूथचा त्रास संपणार! गडकरींचा मास्टरप्लान — आता महामार्गावर ‘नो-स्टॉप’ प्रवास

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ५ डिसेंबर २०२५ | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत जाहीर केलेली माहिती वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरली आहे. देशातील सध्याची टोल कलेक्शन प्रणाली आता इतिहासजमा होणार असून, पुढील एका वर्षात पूर्णपणे नवी इलेक्ट्रॉनिक व्यवस्था लागू केली जाणार आहे. यानंतर महामार्गावर टोलसाठी रांगेत थांबण्याची गरजच उरणार नाही—वाहन सुसाट, प्रवास विनाअडथळा!

गडकरी यांनी सांगितले की ही अत्याधुनिक प्रणाली देशातील 10 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि पुढील एक वर्षात संपूर्ण भारतात तिचा विस्तार होणार आहे. याच वेळी त्यांनी देशभर सुरू असलेल्या ४,५०० महामार्ग प्रकल्पांसाठी तब्बल १० लाख कोटींची गुंतवणूक होत असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही दिली.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या NETC कार्यक्रमांतर्गत FASTag ही कणा असलेली इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली आधीच कार्यरत आहे. वाहनाच्या विंडस्क्रीनवरचा RFID टॅग टोलबूथवर स्कॅन होतो आणि रक्कम थेट खात्यातून वजा होते. मात्र आता पुढील टप्प्यात ही प्रणाली इतकी प्रगत होणार आहे की वाहन थांबवण्याचीही गरज उरणार नाही—पूर्णपणे ऑटो-डिडक्शन आणि स्मार्ट ट्रॅकिंग.

याच दरम्यान, प्रदूषणाचा विषय उपस्थित करत गडकरी यांनी पर्यायी इंधनाच्या वापरावर भर दिला. स्वतः टोयोटाच्या ‘मिराई’ हायड्रोजन गाडीचा वापर सुरू केल्याची माहिती देत त्यांनी, “हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे,” असे स्पष्ट मत मांडले. ‘मिराई’चा अर्थही ‘भविष्य’ असा असल्याचे त्यांनी नमूद केले.

रस्ते अपघातग्रस्तांसाठी सरकारच्या कॅशलेस उपचार योजनेविषयीही त्यांनी माहिती दिली. ६.८३३ लाख अपघातग्रस्तांपैकी ५.४८० जणांना उपचारांसाठी मंजुरी देण्यात आली असून उर्वरित २०% प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. या योजनेत १.५० लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे कॅशलेस दिले जातील.

दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गाबाबतची महत्त्वाची घोषणा करत त्यांनी सांगितले की एप्रिल २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होणार आहे. खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती त्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *