![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ५ डिसेंबर २०२५ | लग्नसराई सुरू असताना सोन्याच्या किंमती अक्षरशः आकाशाला भिडत आहेत. २०२५–२६ या हंगामात सोन्याच्या भावाने कधी घसरण तर कधी विक्रमी वाढ अशी रोलर कोस्टर सफर केली. पण सध्या सोनं पुन्हा महागाईच्या शिखरावर. लग्नासाठी सोनं खरेदी करायचं तर खिशाला मोठी कात्री बसणार, इतकी किंमत वाढली आहे. सामान्य खरेदीदारांच्या बजेटला या वाढीचा मोठा फटका बसतोय.
आज ५ डिसेंबरला २४ कॅरेट सोन्याचे दर पुन्हा उंचावले. १० ग्रॅम सोनं तब्बल २७० रुपयांनी महाग झालं असून एका तोळ्याची किंमत थेट १,२९,९३० रुपये झाली आहे. १०० ग्रॅमचे दर २,७०० रुपयांनी वाढले असून १० तोळ्यांसाठी तब्बल १२,९९,३०० रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे २४ कॅरेट सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी वाढ आहे.
२२ कॅरेट सोनंचाही आलेख चढाच आहे. १० ग्रॅमवर २५० रुपयांची वाढ, तर १ तोळा आता १,१९,१०० रुपये झाला आहे. १० तोळ्यांसाठी खरेदीदारांना ११,९१,००० रुपये द्यावे लागणार आहेत. कमी कॅरेट घेऊन सुटका होईल का? तर १८ कॅरेट सोन्याचे दरही वाढीतून सुटलेले नाहीत. १० ग्रॅमवर २१० रुपयांची वाढ, आणि १ तोळा सोनं आता ९७,४५० रुपयांवर पोहोचलं आहे.
दरम्यान सोनं महाग होत असताना चांदी मात्र स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात ४ रुपयांची घसरण झाली असून १ ग्रॅम चांदी १८७ रुपये इतकी झाली आहे. १ किलो चांदीचे दर तब्बल ४,००० रुपयांनी घसरले असून आता १ किलो चांदी १,८७,००० रुपयांना मिळत आहे. म्हणजे सोनं गगनाला भिडलं असलं तरी चांदी खरेदीदारांसाठी सध्या हंगाम चांगला आहे.
