![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ | राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे द्राक्ष उत्पादनाला बसलेल्या मोठ्या फटक्याचा थेट परिणाम वाइन उद्योगावर झाला आहे. द्राक्षांचे उत्पादन जवळपास ६० टक्क्यांनी घटल्याने वाइन निर्मितीत तब्बल १ कोटी लिटरची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत वाइनच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून ‘न्यू इअर सेलिब्रेशन’साठी तयारी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
नाशिक, सोलापूर, पुणे, धाराशिव, सांगली आणि सातारा या द्राक्षपट्ट्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. दिवाळीनंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. द्राक्षशेतीचे क्षेत्रही १० हजार हेक्टरवरून ६ हजार हेक्टरपर्यंत खाली आल्याची माहिती समोर आली आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे वाइनसाठी लागणाऱ्या द्राक्षांच्या किमती दुपटीने वाढून ४०–५० रुपये किलोपर्यंत गेल्या.
दरवर्षी साधारण ३ कोटी लिटर वाइनचे उत्पादन होत असले तरी यंदा ते मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे संकेत आहेत. उत्पादनाचा खर्च वाढल्याने आणि कच्चा माल कमी झाल्याने बाजारात वाइनचे दर वाढण्याची शक्यता आता पक्की मानली जात आहे. त्यामुळे नववर्ष साजरे करताना ‘वाइन बिल’ वाढण्याची शक्यता असून ग्राहकांना जास्त खर्च करावा लागू शकतो.
