![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १२ डिसेंबर २०२५ | इंडिगो एअरलाईन्सची उड्डाणसेवा अखेरपर्यंत विस्कळीतच राहिली आहे. गेले दहा दिवस सुरू असलेल्या गोंधळाचा परिणाम आज अकराव्या दिवशीही दिसून आला. देशभरात तब्बल 250 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली, तर अनेक उड्डाणे मोठ्या उशिराने धावली. प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
सीईओ पीटर अल्बर्स यांची दोन तास चौकशी
इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांची DGCA कडून जवळपास दोन तास चौकशी करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान खालील मुद्द्यांवर सविस्तर प्रश्न विचारण्यात आले—
मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कर्मचारी तैनाती
फ्लाईट ऑपरेशन्समधील तांत्रिक अडथळे
रद्द उड्डाणांचे रिफंड
प्रवाशांना देण्यात येणारी नुकसानभरपाई
DGCA ने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इंडिगोच्या मुख्यालयात तैनात करण्याचा निर्णय घेतला असून हे अधिकारी रोजचा अहवाल थेट DGCA ला सादर करणार आहेत.
प्रवाशांना 10 हजार रुपयांचे अतिरिक्त ट्रॅव्हल व्हाऊचर
गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी इंडिगोने अतिरिक्त मदतीची घोषणा केली आहे.
३ ते ५ डिसेंबर दरम्यान उड्डाणे रद्द झाल्यामुळे ज्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, अशा प्रवाशांना १० हजार रुपयांचे ट्रॅव्हल व्हाऊचर देण्यात येणार आहे.
हे व्हाऊचर पुढील अटींसह दिले जातील—
तिकीट रद्द झाल्यानंतर २४ तासांच्या आत मिळणाऱ्या ५ ते १० हजार रुपयांच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त हे अतिरिक्त व्हाऊचर असेल.
व्हाऊचर एक वर्षापर्यंत वैध असेल.
“जास्त त्रास झालेले प्रवासी” या वर्गात नेमके कोण येतात, याबाबत कंपनीकडून अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.
