![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १३ डिसेंबर २०२५ | इंडिगो एअरलाइन्सने आपली विमानसेवा पूर्ववत होत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात मुंबई विमानतळावरील विलंबाचा फटका आता इतर विमान कंपन्यांनाही बसत असल्याचे चित्र आहे. इंडिगोची विमाने उशिराने दाखल होत असल्यामुळे मुंबईसह नागपूर विमानतळावरील इतर कंपन्यांच्या उड्डाणांनाही विलंब होत आहे.
नागपूर–मुंबई उड्डाणांनाही फटका
राज्यातील उपराजधानी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानसेवांवरही या घोळाचा परिणाम झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडिया कंपनीचे नागपूर–मुंबई विमान रात्री १०.१० वाजता नियोजित होते, मात्र ते रात्री ११.१५ नंतरच उड्डाण करू शकले.
हे विमान आधी गोव्याहून मुंबईत आणि त्यानंतर मुंबईहून नागपूरला विलंबाने पोहोचले होते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “इंडिगोच्या गोंधळाचा फटका देशातील बहुतेक प्रमुख विमानतळांना बसत आहे.” मात्र, विलंबाची ठोस कारणे प्रवाशांना स्पष्टपणे सांगण्यात आली नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
प्रवासी नागपूर विमानतळावर अडकले
नागपूरहून दिल्ली, बेंगळुरू आणि पुणे येथे जाणाऱ्या विमानांचे प्रवासीही विमानतळावर अडकून पडल्याची माहिती आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनामुळे काही व्हीआयपी विमानांना प्राधान्य दिले जात असल्याने प्रवासी विमानांना उशीर होत असल्याची चर्चा होती, मात्र याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
मुंबई विमानतळावरील मर्यादा ठरत आहेत अडचणीचे कारण
हवाई वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, मुंबई विमानतळावर रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात, त्यामुळे त्यांना प्राधान्य द्यावे लागते. मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या, तरी त्या समांतर नसल्याने एकावेळी एकाच धावपट्टीचा वापर करावा लागतो.
यातच इंडिगोची विमाने उशिराने येत असल्याने त्यांना तातडीने धावपट्टी उपलब्ध करून द्यावी लागत आहे. परिणामी इतर विमान कंपन्यांच्या उड्डाणांचे वेळापत्रक कोलमडत असून प्रवाशांना विलंबाचा फटका सहन करावा लागत आहे.
प्रवाशांचा पुन्हा मनस्ताप
मुंबई विमानतळावरील परिस्थिती लक्षात घेऊन इतर विमान कंपन्या उड्डाणांचे नियोजन करत असल्या, तरी सतत बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे हे नियोजनही अयशस्वी ठरत आहे. परिणामी प्रवाशांना पुन्हा एकदा विलंब, प्रतीक्षा आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
