Weather Update : पुण्यासह साताऱ्यात ‘मिनी काश्मीर’चा फील; थंडीचा अलर्ट, शाळेच्या वेळेत बदलाची मागणी

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १३ डिसेंबर २०२५ | राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. काही ठिकाणी तर महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंडी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत असून अनेक भागांत हुडहुडी भरली आहे.

पुणे महाबळेश्वरपेक्षा अधिक गारठले
पुण्यात किमान तापमान थेट ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने सकाळी आणि रात्री तीव्र गारवा जाणवत आहे. नागरिकांकडून गरम कपड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

साताऱ्यात ‘मिनी काश्मीर’चा अनुभव
महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्यात थंडीचा कडाका अधिक वाढला आहे. साताऱ्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून त्यामुळे ‘मिनी काश्मीर’चा फील येत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात असून मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.

थंडीच्या यलो अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदलाची मागणी
पश्चिमेकडून वाहणाऱ्या अतिथंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट किंवा लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २५ डिसेंबरपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जळगाव जिल्ह्यात शाळेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तापमान ५ ते ८ अंशांपर्यंत घसरत असल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दाट धुके, अती थंडी आणि काही विद्यार्थ्यांची कमी रोगप्रतिकारशक्ती लक्षात घेता, शाळांना सुट्टी देणे किंवा वेळेत बदल करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. यासाठी संविधानातील कलम २१ (सुरक्षित जीवनाचा हक्क) याचा आधार देण्यात आला आहे.

जळगाव, कोकणातही थंडीची लाट
कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात तापमान थेट ६.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. नागरिक सकाळी बाहेर पडताना गरम कपड्यांचा आधार घेत असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
कोकणातील दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर परिसरातही सलग चौथ्या दिवशी तापमानात घट नोंदवली गेली असून नागरिकांना थंडीची तीव्रता जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *