New UPI Feature : खिशात शून्य, पण UPI हिरो! ‘आधी पेमेंट, नंतर पैसे’चा नवा चमत्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २७ जानेवारी | कधीकाळी “खात्यात पैसे आहेत का?” हा प्रश्न आई लग्नाआधी विचारायची. आज तोच प्रश्न UPI विचारतो. फरक इतकाच, की आता UPI स्वतःच म्हणतंय — “पैसे नसले तरी चालतील!” NPCI ने सुरू केलेलं ‘UPI Now Pay Later’ हे फीचर म्हणजे डिजिटल युगातला आर्थिक विनोद नाही, तर थेट क्रांती आहे. कालपर्यंत Balance insufficient हा मेसेज पाहून जो माणूस किराणा दुकानदारासमोर मान खाली घालत होता, तोच आज आत्मविश्वासाने QR कोडसमोर उभा राहणार आहे. बँकेत पैसे नसले तरी पेमेंट होणार—हे ऐकून मध्यमवर्ग सुखावतोय आणि अर्थतज्ज्ञ डोळे चोळतायत. अत्रे असते तर म्हणाले असते, “पूर्वी उसनं घ्यायला माणूस लागायचा, आता फक्त नेटवर्क पुरेसं आहे!”

हे Now Pay Later म्हणजे साधं उधार नाही, तर सभ्य उधार आहे. बँक तुमच्याकडे येते, तुमचा CIBIL स्कोअर तपासते, तुमचा आर्थिक इतिहास चाळते आणि मग म्हणते—“घ्या साहेब, २० हजार… ५० हजार!” आणि तेही कोणतीही फाईल, कोणताही सहीचा ढीग नाही. UPI पेमेंट करताना फक्त ‘Credit Line’ निवडायची आणि व्यवहार पूर्ण. चहा, पिझ्झा, पेट्रोल, ऑनलाइन शॉपिंग—सगळं आधी, पैसे नंतर. बिल येईल, तारखेला भरा, नाहीतर व्याजाचा चाबूक तयारच आहे. म्हणजे स्वातंत्र्य आहे, पण शिस्तीसह. “ही सवलत आहे; माफी नाही!” कारण उधारीची चव गोड असली, तरी विसर पडला तर तीच उधारी कडू होते.

या फीचरचे फायदे ऐकले की सामान्य माणूस आनंदी होतो—पेमेंट फेल नाही, गरजेच्या वेळी क्रेडिट हाताशी, सगळं डिजिटल आणि झटपट. पण यात एक सूक्ष्म इशाराही आहे. पैसे नसतानाही पेमेंट करणं सोपं झालं, म्हणजे खर्च करण्याची सवय वाढणार. ‘आत्ता घेतो, नंतर बघू’ ही मानसिकता धोकादायक ठरू शकते. ७५० चा CIBIL स्कोअर ही अट म्हणजे बँक सांगतेय—“शहाण्यालाच उधार!” ज्याला आर्थिक शिस्त आहे, त्याच्यासाठी हे वरदान; उधळपट्टी करणाऱ्यासाठी सापळा. त्यामुळे UPI Now Pay Later हे जादूचं काठी नाही, तर धारदार शस्त्र आहे—योग्य वापर केला तर सोयीचं, चुकलं तर महाग. शेवटी प्रश्न एकच: UPI बदललंय, पण आपली सवय बदलणार का?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *