![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २७ जानेवारी | आजचा माणूस शरीराने माणूस आहे, पण वागण्यात? हा प्रश्न सध्या कुठल्याही संसदेत, स्टुडिओत किंवा सोशल मीडियावर विचारला जात नाही; पण तो थेट सांगलीच्या विशाल मैदानात, निरंकारी संत समागमात विचारला गेला. निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराजांनी एका वाक्यात आजच्या युगाचा एक्स-रे काढला — “केवळ मनुष्याचे शरीर धारण करणे नव्हे, तर मानवीय गुणांनी युक्त होणेच मानव होण्याचे प्रमाण आहे.” , “आज शरीराला वजन आहे, पण माणुसकीला वजन उरलेले नाही.” लाखोंची गर्दी असूनही गोंधळ नाही, भेद नाही, श्रेष्ठ-कनिष्ठ नाही — हा चमत्कार नाही, ही जाणीव आहे. जाती, भाषा, प्रांत विसरून एकत्र बसलेला मानवसमुदाय म्हणजे अनेकतेत एकतेचे जिवंत पोस्टरच!
सतगुरु माताजींनी मानव जीवनाचा अर्थ सांगताना फार मोठे ग्रंथ उघडले नाहीत, तर सरळ आरसा दाखवला. मनुष्य तन मिळालंय, ते झोपेत घालवण्यासाठी नाही; तर परमात्म्याच्या जाणिवेसाठी — हे ऐकताना अनेकांना पहिल्यांदाच आपण ‘जागे’ आहोत की ‘झोपेत’ याचा विचार करायला भाग पाडलं. परमात्म्याचे दर्शन म्हणजे केवळ डोळ्यांचा खेळ नव्हे, तर दृष्टिकोनाचा बदल आहे. एकदा हा बदल झाला की समोरचा माणूस जातीत नाही, तर माणुसकीत दिसतो. आज जिथे “मी” मोठा आणि “तू” लहान, असा अहंकाराचा खेळ सुरू आहे, तिथे निरंकारी समागम “आपण” या विसरलेल्या शब्दाची आठवण करून देतो. माताजींचा इशारा स्पष्ट होता — दिव्य गुण निवडायचे की अहंकार, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य माणसाकडे आहे; प्रश्न इतकाच की तो काय निवडतो?
या विचारांना बौद्धिक चौकट मिळाली ती निरंकारी राजपिता रमितजींच्या स्पष्ट भाषणातून. देवाची पूजा, जप, पठण सगळं सुरू आहे; पण मी कोण? देव कुठे? जीवनाचा हेतू काय? — या प्रश्नांची उत्तरे मात्र रिकामीच. कारण ज्ञानाशिवाय भक्ती अंध असते. परमात्म्याची ओळख झाली, की तो देव मंदिरात नाही, तर प्रत्येकात दिसतो. आणि मग अहंकाराचा “मी” गळून पडतो. याच समागमात उभारलेली ‘आत्ममंथन’ प्रदर्शनी म्हणजे विचारांची प्रयोगशाळाच. इतिहास, सेवा, बालप्रेरणा आणि समाजकल्याण — सगळं एका ठिकाणी. पाच लाखांहून अधिक भाविकांनी रांगा लावून ही प्रदर्शनी पाहणं म्हणजे माणसाला अजूनही माणूस व्हायची ओढ आहे, याचा पुरावा. शेवटी सांगायचं तर — जिथे उपदेश नाही, पण बोध आहे; तिथेच खरं परिवर्तन घडतं.
