महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २७ जानेवारी | आजची पिढी स्मार्टफोन झाली, पण तिचं बालपण मात्र सायलेंट मोडवर गेलं आहे. अशा काळात संत तुकाराम नगरमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेच्या मैदानात घडलेला ‘आठवण… म्हणजे पुन्हा बालपणात या’ हा उपक्रम म्हणजे काळाच्या गालावर दिलेली प्रेमळ थापच! गॅजेट फ्री अवर्स अकॅडमीच्या पुढाकाराने रविवारी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत मैदानात जे दृश्य होतं, ते पाहून असे वाटते — “माणसं मोठी झाली; पण आज आनंद मात्र लहानच राहिला!” डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सैनिक, राजकारणी अशा सर्व स्तरातील मंडळींनी पदव्या बाजूला ठेऊन भोवरा फिरवला, गोट्या खेळल्या, विटी-दांडूने बालपण पुन्हा जिवंत केलं. हरवलेला घाम, विसरलेलं हसू आणि नात्यांमधील मोकळेपणा या मैदानात पुन्हा सापडला.
या उपक्रमाचा कळस म्हणजे — ५०० मुलांनी एकाच वेळी ५०० फुटबॉल किक मारून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले ! जगात कुठेही न झालेला हा विक्रम इथे साकारला गेला आणि त्या सर्व ५०० मुलांना फुटबॉल भेट देण्यात आले. उद्देश एकच — मुलांना मैदानाकडे वळवा! या विक्रमासाठी लंडन बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र, मेडल आणि सन्मानचिन्ह गॅजेट फ्री अवर्स अकॅडमीला प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू परेश शिवाळकर, एमआयटी कॉलेजच्या संचालिका सुनीता कराड, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर तुषार हिंगे, कामगार नेते यशवंत भोसले, नगरसेवक जितेंद्र ननावरे, वर्षाताई जगताप, सामाजिक कार्यकर्ते अमित भोसले, वायसीएम हॉस्पिटलचे अधीक्षक, हॉटेल सूर्याचे संस्थापक दत्ता सुरवसे यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
या उपक्रमाच्या यशामागे आयोजक म्हणून नेचर डिलाईटचे अर्जुनराव देसाई, सुमन इलेक्ट्रिकचे बालाजी कदम, चामुंडा मार्बल्सचे राकेश जैन यांचे योगदान मोलाचे ठरले. संध्याकाळी झी मराठी लिटिल चॅम्प्स फायनलिस्ट अनाया देसाईसह मकरंद पाटणकर, दृष्टी बलानी, शैलेश भावसार यांनी संगीताने रंगत वाढवली. संस्थापक निश्चल मोरे, राकेश गायकवाड, मायल्या मामा खत्री, महेश देशपांडे, शैलेंद्र भावसार, आशिष जाधव, राजू पावले, प्रवीण जाधव, नीलेश खोल्लम, डॉ. डॉमनिक सॅम्युएल, नेल्सन सॅम्युएल, रियाज इनामदार, बाळासाहेब कलापूरे, योगेश शहा, दीपक काची, अभय सांगळे, सागर गोरे, अमित काटे, नाझीम शेख, अब्दूल मुल्ला, डॉ. सुशीलकुमार शिंदे, मंगेश येरुंकर, गणेश शेलार, अलोसिस इग्नेसिस, डॉ. सुरेश पाटील, अनिल भोसले, इलियाज मगदूम, नितीन भावसार, प्रशांत खत्री, बाळू भिडवे, मंदार देशपांडे,इम्तियाझ ईनामदार या सर्वांनी मिळून सांगितलं — आरोग्यासाठी अॅप नाही, तर मैदान हवं!
निश्चल मोरे यांचे मनोगत –
“मोबाईलने जग जवळ आलं, पण माणसं दूर गेली.म्हणूनच आज आम्ही मुलांना पुन्हा मैदानात आणलं —कारण खऱ्या आयुष्याचं Wi-Fi म्हणजे खेळ!”
