महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २८ जानेवारी | आज सकाळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी समोर आली. या बातमीनंतर काही वेळानेच अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्याची माहिती आहे. दादा गेले हे कळताच महाराष्ट्र हळहळला. आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली चार दशके सातत्याने चर्चेत राहिलेले नाव म्हणजे अजित पवार. धडाडीचा स्वभाव, थेट निर्णयशैली आणि प्रशासनावर पकड यामुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. शरद पवारांचे पुतणे आणि राजकीय वारसा लाभूनही अजित पवारांनी आपली कारकीर्द मेहनतीने घडवली.
अजित पवार यांनी १९९१ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी बारामती विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. तेव्हापासून बारामती हा त्यांचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. ते आतापर्यंत सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले असून राज्याच्या राजकारणात हा एक विक्रम मानला जातो.
तीन दशकांहून अधिक काळ मंत्रिपद भूषवणारे अजित पवार राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. अर्थमंत्री, जलसंपदामंत्री, ग्रामविकास मंत्री अशा महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला. पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही भूमिका बजावली.
जलसंपदा विभागाच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले, तरी त्यांनी ते वेळोवेळी फेटाळले. राजकीय संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि सत्ता बदलांच्या काळातही अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रस्थानी राहिले आहेत.
