![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १३ डिसेंबर २०२५ | पुण्यात बनावट औषधांचा मोठा रॅकेट उघडकीस आला असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत २ लाख ७५ हजार रुपयांचा बोगस औषधांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात पुण्यातील औषध विक्रेते, वितरक आणि बाहेरील राज्यांतील पुरवठादारांसह एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिक्कीमच्या नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट औषधे
FDA चे सहआयुक्त गिरीष हुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीच्या नावाखाली ट्रिप्सिन या औषधाची बनावट आवृत्ती पुण्यात विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे १६ ऑक्टोबर २०२५ रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील ‘अक्षय फार्मा’ या मेडिकल दुकानावर छापा टाकून औषधांचा नमुना चाचणीसाठी जप्त केला.
बिहारपर्यंत पोहोचले धागेदोरे
तपासात उघड झाले की, संबंधित औषध इतर दोन वितरकांकडून खरेदी करण्यात आले होते. पुढील चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे थेट बिहारमधील गोपालगंजपर्यंत पोहोचले.
➡️ FDA ने गोपालगंज येथील सहाय्यक ड्रग्ज कंट्रोलर यांच्याशी पत्रव्यवहार केला असता,
➡️ ‘महिवाल मेडिको’ ही पेढी बंद असून तिचा औषध परवाना २० नोव्हेंबर २०२४ रोजीच संपुष्टात आल्याची माहिती समोर आली.
सिक्कीम कंपनीनेही नाकारली जबाबदारी
दरम्यान, टेरेंट फार्मास्युटिकल्स (सिक्कीम) यांच्याकडे पाठवलेल्या नमुन्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर,
➡️ संबंधित औषध त्यांनी तयार केलेले नाही,
➡️ तसेच ते त्यांच्या कंपनीचे उत्पादनच नाही, असे अधिकृत पत्राद्वारे FDA ला कळवण्यात आले.
८ जणांवर गुन्हा दाखल, तपास सुरू
या संपूर्ण तपासाच्या आधारे २.७५ लाख रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
अक्षय हसमुख पुनिया, अमृत बस्तीमल जैन, मनिष अमृत जैन, रोहित पोपट नावडकर, देवेंद्र यादव, उमंग अभय रस्तोगी, महेश गर्ग आणि सोनी महिवाल. सध्या पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन बनावट औषधांचे जाळे आणखी कुठपर्यंत पसरले आहे, याचा तपास करत आहेत.
