✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल आणि भारताचा पंतप्रधान बदलून मराठी व्यक्ती पंतप्रधान बनेल, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ही व्यक्ती भाजपमधीलच असू शकते, असे सूचक विधानही त्यांनी केलं.
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनगणमन’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना चव्हाणांनी हा अंदाज व्यक्त केला. जगात सुरू असलेल्या घडामोडींचा संदर्भ देत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचे पडसाद भारतात उमटतील, असं ते म्हणाले.
चव्हाणांनी अमेरिकेतील एका मोठ्या स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख करत, एका माजी गुप्तहेराने अनेक दिग्गजांवर गुप्त कॅमेऱ्यांद्वारे पुरावे गोळा केल्याचा दावा केला. या प्रकरणात १९ डिसेंबरला अमेरिकेत काही मोठी नावं जाहीर होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या घडामोडींचा परिणाम भारताच्या राजकारणावर होऊ शकतो आणि त्यातून सत्तेत मोठा बदल घडेल, असा अंदाज चव्हाणांनी व्यक्त केला. मात्र यात नेमकी कोणती नावं असतील, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
