![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १५ डिसेंबर २०२५ | पुण्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीने पुणेकरांची परीक्षा पाहिली. गणेशखिंड रोडवरील उड्डाणपुलाच्या कामासोबतच बस आणि ट्रकच्या अपघातामुळे पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर हा मुख्य रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे. या मार्गावर ३ ते ४ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून, अवघ्या ३-५ मिनिटांच्या प्रवासाला ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत आहे. सकाळी ऑफिस, महाविद्यालय आणि आयटी पार्ककडे निघालेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशखिंड रोडवर मध्यरात्री मेट्रोच्या पिलरला एका खाजगी बसची धडक बसली. त्यानंतर बसच्या मागून येणाऱ्या ट्रकनेही धडक दिल्याने दुहेरी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातग्रस्त वाहने घटनास्थळीच अडकल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अपघातामुळे या ठिकाणची एक लेन तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून, वाहने बाजूला काढण्यासाठी वेळ लागत आहे.
दरम्यान, हा मार्ग हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम आणि अपघाताची भर यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
🔹 औंध–पिंपरी चिंचवड कडून येणाऱ्या वाहनांनी खडकी अंडरपासमार्गे शिवाजीनगरकडे जावे.
🔹 बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांनी एबीआयएल हाउसजवळ डावीकडे वळून रेंजल मार्गाचा वापर करावा.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांनी शक्यतो या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
