✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १६ डिसेंबर २०२५ | राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेचे अचूक भौगोलिक स्थान (अक्षांश–रेखांश) आता शासनाकडे उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या ‘युडायस प्लस जीआयएस कॅप्चर’ मोबाईल ॲपचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
या ॲपद्वारे संकलित होणारी माहिती केंद्र, राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर शालेय शिक्षणाच्या नियोजन, संसाधनांचे योग्य वाटप, धोरणात्मक निर्णय आणि अचूक विश्लेषणासाठी वापरली जाणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी याबाबत सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. शाळा नेमकी कुठे आहे आणि नकाशावर तिचे स्थान अचूकपणे नोंदले जावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (NIC) सहकार्याने हे ॲप विकसित करण्यात आले असून, ते ॲण्ड्रॉइड व आयओएस दोन्ही प्रणालींसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या ठिकाणी उपस्थित राहून युडायस प्लसचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून माहिती नोंदवणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकही शाळा या प्रक्रियेबाहेर राहू नये, याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनावर देण्यात आली आहे. शाळांची अचूक भौगोलिक माहिती उपलब्ध झाल्यामुळे भविष्यात शाळा एकत्रीकरण, नवीन शाळांना मंजुरी, शिक्षक नियुक्ती, पायाभूत सुविधा विकास आणि विद्यार्थ्यांच्या संख्येचे विश्लेषण अधिक परिणामकारक आणि पारदर्शक पद्धतीने करता येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
