![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १६ डिसेंबर २०२५ | उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून धुळे, नाशिक, परभणी आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीची लाट धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या भागांतील किमान तापमान ५ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘ला निना’च्या प्रभावामुळे ही थंडी जानेवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबई–ठाण्यासह राज्यातील अनेक भागांत तापमानात सातत्याने घट होत आहे. मुंबईत सलग पाचव्या दिवशी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले असून, सांताक्रूझ येथे १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
दरम्यान, राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका अधिक जाणवत असून धुळे, जेऊर, निफाड, परभणी, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा या भागांत हाडे गोठवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे. पुढील काही दिवस थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
