1
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च २०२६ ।। लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram च्या प्रायव्हसी पॉलिसीत मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ८ मेपासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे युजर्सच्या खासगी चॅटिंगवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर पाठवले जाणारे काही संदेश पूर्वीसारखे पूर्णपणे गोपनीय राहणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे युजर्समध्ये प्रायव्हसीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Meta Platforms कंपनीने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी काही वर्षांपूर्वी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हे फीचर सुरू केले होते. या तंत्रज्ञानामुळे संदेश पाठवणारा आणि प्राप्त करणारा यांच्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीला ते वाचता येत नव्हते. मात्र आता प्रायव्हसी पॉलिसीत बदल करताना कंपनीने या फीचरच्या वापरासंदर्भात नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे इन्स्टाग्रामवरील काही खासगी चॅट्सची हाताळणी आणि डेटा व्यवस्थापनाची पद्धत बदलणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.

