![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च २०२६ ।। देशात घाऊक महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात वाढून ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. Wholesale Price Index आधारित घाऊक महागाई दर फेब्रुवारीमध्ये २.१३ टक्क्यांवर नोंदविण्यात आला असून ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. उद्योग मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्य आणि बिगरखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. भाज्यांच्या किमतीत काहीशी घट झाली असली तरी इतर अनेक वस्तूंच्या दरवाढीमुळे एकूण महागाईचा दबाव कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर १.८१ टक्के होता, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तो २.४५ टक्के नोंदविण्यात आला होता. फेब्रुवारीत खाद्यवस्तूंचा महागाई दर २.१९ टक्के झाला असून जानेवारीत तो १.५५ टक्के होता. डाळी, बटाटे, अंडी, मांस आणि मासे यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खाद्य महागाईत वाढ झाली आहे. दुसरीकडे भाज्यांच्या महागाईत घट झाली असून जानेवारीतील ६.७८ टक्क्यांवरून ती फेब्रुवारीत ४.७३ टक्क्यांवर आली आहे. उत्पादित वस्तू, मूलभूत धातू, वस्त्रोद्योग तसेच बिगरखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाईत वाढ झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव प्रतिपिंप सुमारे १०० डॉलरच्या आसपास पोहोचल्याने पुढील काळात महागाईवर अधिक दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, तेलदरवाढीचा परिणाम खते, ॲल्युमिनियम तसेच वाहतूक खर्चावर होऊ शकतो. त्यामुळे घाऊक महागाईचा वेग आगामी महिन्यांत वाढू शकतो. Devendra Pant (इंड-रा) यांनीही तेलाच्या वाढत्या किमतीमुळे मार्चमध्ये घाऊक महागाईचा दर सुमारे ३.७ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.
