आयकराच्या नावाने ‘ई-मेल’चा सापळा! बनावट नोटिसांनी करदाते टार्गेट; एका क्लिकने खाते रिकामे होण्याचा धोका

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च २०२६ ।। डिजिटल युगाने व्यवहार सोपे केले, पण त्याचबरोबर फसवणुकीचे नवे मार्गही उघडले आहेत. सध्या अनेक करदात्यांच्या ई-मेल इनबॉक्समध्ये 2025-26 या आर्थिक वर्षाच्या बनावट असेसमेंट ऑर्डर किंवा कर मागणीच्या नोटिसा येत असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर Income Tax Department ने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचे ई-मेल पूर्णपणे बनावट असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेकांना अधिकृत स्वरूपाचा भास होईल अशा पद्धतीने हे ई-मेल तयार केले जातात. त्यामध्ये सरकारी भाषाशैली, नोटीस क्रमांक आणि कर भरण्याची तातडीची सूचना दिलेली असते. त्यामुळे अनेक करदाते घाबरून त्या ई-मेलमधील सूचनांचे पालन करतात आणि याच क्षणाची वाट पाहत असतात सायबर गुन्हेगार.

या फसवणुकीची पद्धतही अत्यंत धूर्त आहे. ई-मेलमध्ये साधारणपणे एक लिंक दिलेली असते आणि ती तातडीने क्लिक करण्याची सूचना केली जाते. ही लिंक उघडताच वापरकर्त्याला अधिकृत वेबसाइटसारखी दिसणाऱ्या बनावट संकेतस्थळावर नेले जाते. तिथे पॅन क्रमांक, पासवर्ड, ओटीपी, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याची माहिती भरायला सांगितली जाते. काही वेळा “दस्तऐवज तपासण्यासाठी” अटॅचमेंट डाउनलोड करण्यासही सांगितले जाते. पण प्रत्यक्षात ही अटॅचमेंट संगणक किंवा मोबाईलमध्ये मालवेअर टाकण्याचे साधन असते. एकदा ही माहिती किंवा फाइल डाउनलोड झाली की, हॅकर्सना युजरच्या वैयक्तिक आणि आर्थिक माहितीपर्यंत थेट प्रवेश मिळू शकतो. परिणामी, बँक खात्यातील पैसे गायब होण्यापासून ते ओळख चोरीपर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, अधिकृत कर नोटिसा किंवा आदेश नेहमी विभागाच्या अधिकृत पोर्टलवरूनच दिले जातात. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद ई-मेलमधील लिंकवर क्लिक करू नये किंवा अटॅचमेंट डाउनलोड करू नये. करदात्यांनी आपली वैयक्तिक आणि बँकिंग माहिती कोणत्याही अनोळखी संकेतस्थळावर देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर गुन्हेगारांचे जाळेही तितक्याच वेगाने पसरत आहे. त्यामुळे एका क्लिकपूर्वी दोनदा विचार करणे आणि अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवणे हेच आजच्या काळात सुरक्षिततेचे खरे सूत्र ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *