![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १६ डिसेंबर २०२५ | महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून राबवली जाणारी लाडली बहना योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असले तरी, येत्या काळात हा हप्ता थेट ३००० रुपये करण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार महिलांसाठी मोठा निर्णय घेऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लाडली बहना योजनेची सुरुवात करताना महिलांना १२५० रुपये दिले जात होते. त्यानंतर हळूहळू वाढ करत हा हप्ता १५०० रुपयांपर्यंत नेण्यात आला. आता मुख्यमंत्री मोहन यादव सरकार योजनेचा पुढचा टप्पा आखत असून, महिलांना अधिक आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने हप्त्यात मोठी वाढ करण्याचा विचार केला जात आहे. याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जाहीर करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आगामी निवडणुकांपूर्वी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाढ टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये ५०० रुपयांची वाढ, त्यानंतर २०२७ मध्ये आणखी वाढ आणि अखेरीस २०२८ पर्यंत महिलांना दरमहा ३००० रुपये मिळावेत, असा सरकारचा प्राथमिक विचार असल्याचे सांगितले जात आहे. स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही यापूर्वी “हप्ता टप्प्याटप्प्याने वाढवू” असे विधान केले होते, त्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
दरम्यान, सरकारकडून ६० वर्षांवरील महिलांसाठी स्वतंत्र नवीन योजना सुरू करण्याचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे. या योजनेचा लाभ ज्येष्ठ महिलांना मिळू शकतो. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर लाडली बहना योजना ही देशातील महिलांसाठी सर्वाधिक आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांपैकी एक ठरेल. आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लाडक्या बहिणींसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
