![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात पूर्वी एक काळ होता—“सोनं घेतलं” ही बातमी होती.आता काळ बदललाय—“सोनं पाहिलं” हीच मोठी गोष्ट झालीय.आणि २०२६ आलं की तर पाहणंही परवडणार नाही, अशी स्थिती निर्माण होतेय!
तज्ज्ञ सांगतायत—नव्या वर्षात सोनं थेट १.६० लाख रुपये प्रति १० ग्रॅम,आणि चांदी ३ लाख रुपये किलो गाठू शकते.हे ऐकून सामान्य माणूस विचार करतो—“लग्न करायचं की कर्ज?”
२०२५ हे वर्ष सोन्या-चांदीसाठी सोन्याचं ठरलं.चांदीने तर गुंतवणूकदारांना चक्क १६७ टक्के परतावा दिला!म्हणजे चांदीचा चमचा नसलेल्यांनी निदान तिचं नाव तरी ऐकून समाधान मानावं.
३१ डिसेंबर २०२४ ला जी चांदी ८५ हजारात होती, ती आज २.४२ लाखांवर!एका आठवड्यात २८ हजारांची उडी—इतकी उडी उंदरालाही मारता येत नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात तर चांदी ७५ डॉलर प्रति औंसच्या पुढे.आता पुढचा टप्पा—१०० डॉलर!म्हणजे चांदी आता भांडीघासणीसाठी नाही, सेफमध्ये ठेवण्यासाठी योग्य!
सोन्याचंही काही कमी नाही.७८ हजारांवर असलेलं सोनं थेट १.४० लाखांच्या पुढे गेलं.तज्ज्ञ म्हणतात—२०२६ मध्ये १.६० लाख सहज शक्य!सोनं आता दागिना नसून डिपॉझिट झालंय.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल म्हणतं—सोनं ६० टक्क्यांनी महागलं.कारण काय?जगात युद्ध, तणाव, टॅरिफ, डॉलर कमकुवत—म्हणजे माणूस घाबरतो आणि थेट सोन्याकडे धाव घेतो.देवावर विश्वास नसेल, तरी सोन्यावर असतो!
रिझर्व्ह बँकही म्हणते—“सोनं सुरक्षित आहे.”हे ऐकून सामान्य नागरिक म्हणतो—“सुरक्षित आहे, पण माझ्यापासून दूर आहे!”
चांदीचा वेग जास्त, पण ती अस्थिर.सोनं संथ, पण स्थिर.म्हणजे चांदी म्हणजे तरुण रक्त,आणि सोनं म्हणजे अनुभवी ज्येष्ठ!
तज्ज्ञ सांगतात—दोन्ही ठेवा पोर्टफोलिओत.पण सामान्य माणसाच्या पोर्टफोलिओत आधीच भाजी, भाडं, फी, EMI भरलेली असते.त्यात सोनं-चांदीला जागा कुठून?आज सोनं लग्नासाठी घेत नाहीत,तर लग्न सोन्यासाठी थांबवतायत!चांदीचा वाटा पूर्वी ताटात होता,आता फक्त आकड्यांत उरलाय.
एकूण काय,२०२६ मध्ये सोनं-चांदी आकाशात जाणार,आणि सामान्य माणूस म्हणणार—“आम्ही दागिने नाही, फक्त भाव बघून खुश!”
