₹७२ची सिगारेट : धूर कमी, करांचा धडाका जास्त!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात महागाई वाढली की लोक विचारतात—“काय महाग झालं?”यावेळी उत्तर आलंय—सिगारेट!आणि तीही चक्क ₹७२ एक काडी! म्हणजे आता धूम्रपान करणाऱ्याला फुफ्फुसांइतकाच खिशालाही मोठा धोका.सरकारने सिगारेटवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आणि धूम्रपान करणाऱ्यांच्या तोंडचा धूर थेट डोक्यात गेला. आतापर्यंत १८ रुपयांची काडी ओढणारा माणूस आता विचार करतोय—ओढू की EMI काढू?

सरकारचा उद्देश उदात्त आहे.
“लोक सिगारेट सोडतील.”हे ऐकून लोक म्हणाले—“लोक सिगारेट सोडतील की सिगारेट लोकांना सोडेल?”कारण व्यसन आणि शहाणपण यांचं नातं कधीच नीट जमलेलं नाही.

रेडिटवर एका धूम्रपान करणाऱ्याने पोस्ट टाकली—“मी स्वतः स्मोकर आहे, पण हा निर्णय मला आवडला.”हे वाचून सरकारलाही थोडा धक्का बसला असेल. कारण सामान्यतः स्मोकर म्हणतो—“कर वाढवू नका”इथे म्हणतोय—“वाढवा, कदाचित मी सोडेन!”कदाचित ही सिगारेटपेक्षा महाग आशा आहे.

दिल्लीकरांनी मात्र यावर भन्नाट उत्तर दिलं—“आम्ही तर हवेतूनच सिगारेट ओढतो. तेही फ्री!”दिल्लीच्या प्रदूषणावरचा हा विनोद असला, तरी वास्तव मात्र सगळ्यांनाच धूर दाखवणारं आहे.

काहींचं म्हणणं—“किंमत वाढली की काळा बाजार वाढेल.”खरंच! सिगारेट जर सोन्यासारखी झाली, तर डुप्लिकेट धूर तयार व्हायला वेळ लागणार नाही. बनावट, अधिक घातक पर्याय, आणि आरोग्याचा अजून खेळखंडोबा—हे सगळं शक्य आहे.

नव्या कायद्यानुसार सिगारेट, हुक्का, जर्दा, तंबाखू—सगळ्यांवर करांचा हातोडा.प्रति हजार सिगारेटवरचं शुल्क २७०० ते ११ हजार रुपये!ऐकूनच खोकला यावा असा आकडा.

सरकार म्हणतं—“आरोग्यासाठी.”जनता म्हणते—“महसुलासाठी.”आणि स्मोकर म्हणतो—“आज शेवटची!”
(ही “शेवटची” किती वर्षांपासून सुरू आहे, ते विचारू नये.)

एक गोष्ट मात्र नक्की—₹७२ची सिगारेट ही फक्त काडी नाही;ती आहे सरकारचा इशारा. धूम्रपान सोडा, नाहीतर खिशाला जाळ बसणार!

आता प्रश्न एवढाच—
लोक सिगारेट सोडतील की सिगारेटचे छोटे-छोटे झुरके घेत महाग व्यसन स्वीकारतील?

उत्तर येईलच.
तोपर्यंत धूर हवेत आणि चर्चा सोशल मीडियात—दोन्ही फुल्ल आहेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *