![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १० | पुणेकरांनी यंदाच्या हिवाळ्याचा खरा अनुभव गेल्या दोन दिवसांत घेतला. अचानक घसरलेल्या किमान तापमानामुळे शहर अक्षरशः गारठून गेले आहे. पहाटेच्या वेळी अंगातून हुडहुडी भरावी, अशी थंडी जाणवत असून रस्त्यांवर शाल, स्वेटर, जॅकेट्समध्ये लपेटलेले पुणेकर दिसत आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात शुक्रवारी किमान तापमान थेट ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर पुणे शहराचा सरासरी किमान तापमान ८.४ अंशांवर स्थिरावले. यंदाच्या हिवाळ्यातील हा आतापर्यंतचा सर्वांत थंड दिवस ठरल्याने नागरिकांमध्ये थंडीची जोरदार चर्चा सुरू आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये तापमानात स्पष्ट तफावत जाणवत आहे. दापोडीत ११.९, हडपसरमध्ये ११.६, लवळेमध्ये ११.५ अंश किमान तापमान नोंदविले गेले, तर तळेगावमध्ये तापमान ९.८ अंशांपर्यंत खाली आले. शिवाजीनगर आणि पाषाण भागात अनुक्रमे ८.४ आणि ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, डोंगराळ आणि मोकळ्या परिसरामुळे एनडीए भागात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र जाणवत असून, येथे नेहमीच शहराच्या तुलनेत कमी तापमान नोंदविले जाते. पहाटे धुके, गार वारे आणि कोरडे वातावरण यामुळे थंडीचा जोर अधिक वाढल्याचे जाणवत आहे.
किमान तापमानात घट झाली असली तरी कमाल तापमान मात्र स्थिर आहे. शहरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. दिवसा ऊन चांगले जाणवत असले, तरी सूर्यास्तानंतर थंडी लगेच वाढते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसून येत आहे. आकाश स्वच्छ असल्याने रात्री उष्णता झपाट्याने निघून जाते आणि त्यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट होत आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवस हवामान साधारणपणे स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी किमान तापमान सुमारे ८ अंश, तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, पहाटे आणि रात्रीच्या वेळेत नागरिकांनी थंडीपासून काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी उबदार कपडे वापरणे आवश्यक आहे. थंडीचा हा कडाका अजून काही दिवस पुणेकरांची परीक्षा पाहणार असल्याचे संकेत मिळत असून, हिवाळ्याचा खरा रंग आता शहरात दिसू लागला आहे.
