करोना: ‘या’ कंपनीने केला दावा; अमेरिकेत डिसेंबरमध्ये लस;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ सप्टेंबर – न्यूयॉर्क – जगभरात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सगळ्यांचे लक्ष लशीवर लागले आहे. करोनाला अटकाव करणारी लस कधी उपलब्ध होईल, याची सगळेजण प्रतिक्षा करत आहेत. अमेरिकेतही काही लशींची चाचणी सुरू आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकेत लस उपलब्ध होईल असा विश्वास फायजर कंपनीने व्यक्त केला आहे. फायजरने विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे.

फायजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले की , या वर्षाच्या अखेरपर्यंत करोनाला अटकाव करणारी लस उपलब्ध होईल. फायजर कंपनी बायोएनटेकसोबत (BioNTech) संयुक्तीरीत्या लस विकसित करत आहे. न्यूयॉर्कमधील फायजर आणि जर्मनीची बायोएनटेक कंपनीने विकसित केलेली लस सध्या लस चाचणीत आघाडीवर आहे. त्याशिवाय, मॉडर्ना इंक आणि एस्ट्राजेनका पीएलसी या लशींही स्पर्धेत असून त्यांची चाचणी सुरू आहे. अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले की, ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रायोगिक लशीची परिणामकता जाणून घेण्यासाठी ६० टक्के संधी आहे. अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयावरही लशीचे भवितव्य अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.

फायजर-बायोएनटेक यांनी मानवी चाचणीत सहभागी असलेल्या स्वयंसेवकांची संख्या वाढवली आहे. स्वयंसेवकांमध्ये वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या आठवड्यातील अंतिम टप्प्यातील चाचणीत ३० हजार जणांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कंपनीने म्हटले. त्याशिवाय दोन्ही कंपन्या ही संख्या ४४ हजारांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन स्वयंसेवकांपासून एचआयव्ही बाधित आणि हॅपेटाइटिस-बी बाधितांचाही समावेश करण्यात येणार आहे. सध्या चाचणीत सहभागी होणाऱ्यांमध्ये ६० टक्के श्वेतवर्णीय आणि ४० टक्के कृष्णवर्णीयांचा समावेश असल्याचे बौर्ला यांनी सांगितले. या चाचणीत ४४ टक्के वयस्कर मंडळींचाही समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *